पिंपरी पालिका निवडणुकीसाठी भाजप-शिवसेनेच्या युतीसाठी ‘सकारात्मक’ पाऊले टाकली जात असताना आपणही एकत्र आले पाहिजे, असा विचार राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षात मांडला जाऊ लागला, त्याचाच परिणाम म्हणजे बुधवारी दोन्ही पक्षांच्या शहराध्यक्षांनी एकत्र येऊन निवडणुकीत आघाडी करण्याविषयी प्राथमिक चर्चा केली. ही ‘सदिच्छा’ भेट असल्याचा युक्तिवाद दोन्हीकडून करण्यात आला.

भाजप-शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांमध्ये टोकाचे मतभेद असूनही त्यांच्यात युती करण्याविषयी चर्चा सुरू आहे. पक्षश्रेष्ठी अंतिम निर्णय घेणार असल्याचे दोन्हीकडून सांगण्यात येत असले तरी स्थानिक पातळीवर युतीविषयी सकारात्मक वातावरण आहे. भाजप-सेनेत युतीच्या हालचाली सुरू झाल्याचे लक्षात आल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी, यापूर्वीच काँग्रेसशी आघाडी करण्याचे सुतोवाच केले होते. काँग्रेस नेत्यांनीही फारसे ताणून न धरता अघोषित तयारी दर्शवली होती. सेना-भाजपमध्ये युती झाल्यास काँग्रेस-राष्ट्रवादीला आघाडी करावी लागणार, अशी स्थिती आहे. त्यादृष्टीने राष्ट्रवादीने पहिले पाऊल टाकले आहे. संजोग वाघेरे यांनी सचिन साठे यांना चहासाठी बोलावून या चर्चेला सुरूवात केली. बुधवारी सकाळी पिंपरीगावात दोन्ही नेत्यांमध्ये तासभर चर्चा झाली. युती झाल्यास आघाडी करावी लागेल, इथपासून ते अन्य विविध मुद्दय़ांवर दोहोंमध्ये विस्ताराने चर्चा झाल्याचे सांगण्यात येते. अंतिम निर्णय घेण्यापूर्वी दोन्ही नेत्यांना पश्रश्रेष्ष्ठींचा हिरवा कंदील मिळवावा लागणार आहे. त्यामुळे आताच कोणतीही घोषणा करण्याचे त्यांनी टाळले. तथापि, दोन्ही काँग्रेस एकत्र येऊ शकतात, असा संदेश मात्र कार्यकर्त्यांना मिळाला आहे.