पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या आखाड्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी  स्वबळावर मैदानात उतरणार असल्याचे जवळ जवळ स्पष्ट झाले आहे. पिंपरीत संभाव्य आघाडी तुटली आहे. पिंपरीतील काँग्रेसने ४० जागांची मागणी  केली होती. तर राष्ट्रवादी १०० जागांवर आग्रही होते. मंगळवारी रात्री  झालेल्या चर्चेदरम्यान काँग्रेस  ३२ जागापर्यंत खाली आली. तरी देखील राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडीसाठी तयारी दर्शवली नाही.  रात्री उशिरा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे आणि काँग्रेसचे सचिन साठे यांच्यात आघाडीचा अंतिम निर्णय घेण्यासाठी बैठक झाली. त्यावेळी राष्ट्रवादीने काँग्रेसला २० जागांची ऑफर दिली, पण काँग्रेस  ३० जागांवर अडून राहिले. दरम्यान राष्ट्रवादीच्या प्रस्तावावर नाखुश होऊन काँग्रेसने ही आघाडी तुटल्याची घोषणा केली.

दोन्ही काँग्रेसच्या आघाडीतील बिघाडीमुळे पिंपरी महापालिकेमध्ये आता चांगलीच रंगत निर्माण होण्याचे संकेत दिसत आहेत. पिंपरी पालिकेच्या आखाड्यात सध्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या शिवाय भाजप, शिवसेना,  मनसे, एमआयएम आणि रिपाइं असे सारेच निवडणुकांच्या आखाडय़ात उतरल्याचे दिसतील. बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीत राजकीय पक्ष न पाहता उमेदवाराची कुंडली पाहूनच कौल दिल्याचा पूर्वीचा इतिहास आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकांत कोणाची लॉटरी लागेल, याची खात्री सध्या देता येणे अशक्य आहे.  एखाद्याच पक्षाची निर्विवाद सत्ता येईल की त्रिशंकू अवस्थेला सामोरे जावे लागेल, याचा अंदाज बांधणे देखील कठीण आहे.

पिंपरी पालिकेच्या रणसंग्रामात राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, काँग्रेस, मनसे, एमआयएम असे पक्ष यापैकी जनता कुणाला सत्ता देणार हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.  भाजप-रिपाइं (आठवले गट) यांच्यात युती होणार असली तरी त्यांच्यात जागावाटप व चिन्हाच्या मुद्दय़ावरून बरेच प्रश्न अनुत्तरित आहेत. राष्ट्रवादीला सत्ता टिकवायची आहे. राष्ट्रवादीची गेल्या १५ वर्षांपासून पिंपरी चिंचवड महापालिकेत सत्ता आहे. त्यातील १० वर्षे राष्ट्रवादीने स्वबळावर निर्विवाद बहुमत मिळवले होते. दरम्यान भाजप-शिवसेना सत्ता खेचून आणण्यासाठी मैदानात उतरले आहे. तर  काँग्रेस गतवैभव प्राप्त करण्यासाठी प्रयत्नशील असेल. याठीकाणी मनसेचा लढा अस्तित्वासाठी आहे. तर ‘एमआयएम’ला खाते उघडायचे आहे.