काही प्रभागांत राष्ट्रवादीची काँग्रेसबरोबर मैत्रीपूर्ण लढत  

जातीयवादी पक्षांना सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसची आघाडी झाली पाहिजे, अशी चर्चा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी या वेळी सुरुवातीपासूनच सुरू करून दिली होती आणि उमेदवारी अर्ज भरण्याच्या अंतिम दिवसापर्यंत चर्चा करत राष्ट्रवादीने काही प्रभागांमध्ये काँग्रेस बरोबर आघाडी केली. जातीयवादी पक्षांना रोखण्याच्या या प्रक्रियेत राष्ट्रवादीचाच फायदा झाला, अशी उघड चर्चा काँग्रेसमध्ये ऐकायला मिळत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आघाडी नकोच, अशी भूमिका काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घेतली होती. शहराध्यक्ष रमेश बागवे यांनीही तसा निर्धार सातत्याने बोलून दाखविला होता. राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरच जागा वाटपाचा तिढा वाढल्याचे लक्षात आल्यानंतर कार्यकर्त्यांची भावना लक्षात घेऊन पक्षाच्या मुंबई येथे झालेल्या संसदीय मंडळाच्या बैठकीतही आघाडी तोडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्येही आनंदाचे वातावरण होते. राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आघाडी न करण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला होता तरी अधिकृत घोषणा मात्र त्यांच्या कोणत्याही नेत्याकडून करण्यात आली नव्हती.

आघाडी होऊ नये यासाठी काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पक्षाचे काही कार्यकर्ते, नगरसेवक कराड येथे जाऊन भेटले होते. राष्ट्रवादीबरोबर आघाडी करताना पक्षाची होत असलेली फरफट आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा असमाधानकारक अनुभव यामुळे आघाडी नको, ही कार्यकर्त्यांची भावना पक्षाच्या काही नेत्यांच्या गळी उतरवण्यात आली होती. दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार सातत्याने जातीयवादी पक्षांना रोखण्यासाठी आघाडी हवी असे सांगत होते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हेही आघाडीसाठी सकारात्मक असल्यामुळे आघाडीबाबतचा खेळ सुरू झाला. त्यातच शेवटच्या क्षणी म्हणजे उमेदवारी अर्ज भरण्यास एक दिवस बाकी असताना दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांमध्ये आघाडीबाबतची थांबलेली चर्चा पुन्हा सुरू झाली. त्यानुसार जागा वाटपावरून एकमत होत नसलेल्या काही प्रभागात मैत्रीपूर्ण लढती तर काही ठिकाणी आघाडी करण्याची चर्चा झाली. त्याबाबत काँग्रेसकडून अधिकृत घोषणा करण्यात आली नाही; पण पिंपरी-चिंचवड येथील कार्यक्रमात अजित पवार यांनी मात्र पुण्यात काँग्रेसबरोबर आघाडी केल्याचे पत्रकार परिषदेत जाहीर केले.

आघाडीची चर्चा सुरू झाल्यानंतर काँग्रेसने सन्मानजनक आघाडी व्हावी असे सांगत जागा वाटपाचा प्रस्ताव दिला होता. शेवटपर्यंत ही चर्चा सुरू राहिली. आघाडीत सत्तर जागांची मागणी काँग्रेसने केली होती. पण काही प्रभागात आघाडी झाल्यानंतर अवघ्या तीस जागा त्यांच्या वाटय़ाला आल्या आहेत. तर चोपन्न ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीकरून लढत आहे.

काँग्रेसला अवघ्या ३० जागा

जातीयवादी पक्षांना रोखण्यासाठी आघाडी आवश्यक आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार वेळोवेळी सांगत होते. पण या आघाडीत काँग्रेसचेच नुकसान झाले. आघाडीत अवघ्या तीस जागा काँग्रेसला मिळाल्या. शिवाय राष्ट्रवादीने पुण्यात जातीयवादी पक्षांना रोखण्यासाठी आघाडीची भूमिका घेतली; पण शेजारच्या िपपरीत मात्र आघाडी केली नाही, याकडे काँग्रेसचे कार्यकर्ते लक्ष वेधत आहेत.

पिंपरीत जातीयवादी पक्षांना रोखण्याचा मात्र विसर

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मतांची मतविभागणी होऊन जातीयवादी पक्षांचा लाभ होऊ नये, यासाठी दोन्ही काँग्रेसची आघाडी झाली पाहिजे, असे आग्रही मत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वेळोवेळी मांडले. प्रत्यक्षात मात्र मोक्याच्या क्षणी त्यांनी पुण्यात एक तर िपपरीत दुसरीच भूमिका घेतली. शिवसेना-भाजपची युती होत नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर िपपरीत ‘दुबळय़ा’ अवस्थेत असलेल्या काँग्रेसशी आघाडी करण्यात त्यांनीच खोडा घातला आणि त्यानंतर १२८ पैकी अवघ्या २० जागांची राष्ट्रवादीची ‘ऑफर’ अवमानकारक वाटल्याने काँग्रेसने ती नाकारली.

अजित पवार हे िपपरी महापालिकेचे ‘कारभारी’ आहेत. भारतीय जनता पक्षाची शहरात ताकद वाढल्याने राष्ट्रवादीसमोर पर्यायाने पवारांसमोर कडवे आव्हान उभे राहिले. राष्ट्रवादीला ‘घरचा रस्ता’ दाखवण्याच्या हेतूने भाजप-शिवसेनेची युती व्हावी, यासाठी अनेक घटक प्रयत्नशील होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही पुढाकार घेतला होता. युती होईल, असे संकेत मिळू लागल्यानंतर अजित पवारांनी समविचारी पक्षांशी आघाडी केली पाहिजे, अशी भाषा सुरू केली.

पिंपरीत काँग्रेसशी आघाडी करण्याची तयारी त्यांनी दर्शवली. वास्तविक, शहरातील काँग्रेस अजित पवारांनी संपवली, असा आरोप काँग्रेस वर्तुळात आजही केला जातो. मात्र, तरीही आघाडीसाठी पवारांनी पुढाकार घेतल्यासारखे दाखवले. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांना आघाडीविषयी चर्चा करण्याचे आदेश दिले. वाघेरेंनी काँग्रेस शहराध्यक्ष सचिन साठे यांच्याशी चर्चेचे गुऱ्हाळ सुरू ठेवले. िपपरीतील राष्ट्रवादीची स्थिती बऱ्यापैकी चांगली असल्याने त्यांनी काँग्रेसला फारसे गांभीर्याने घेतले नाही. अवघ्या वीस जागा काँग्रेसला देण्याची तयारी त्यांनी दर्शवली. त्यातही काँग्रेसचे नगरसेवक निवडून आलेल्या जागांवरही राष्ट्रवादीनेच दावा केला. त्यामुळे अशाप्रकारचा अवमानकारक प्रस्ताव काँग्रेसने नाकारला. युती तुटली तेथेच आघाडीचा काडीमोड करण्याचा निर्णय अजित पवारांनी घेतला व त्यानुसार तत्परतेने शिक्कामोर्तबही केले.

काँग्रेसने सुरुवातीला ४० जागा मागितल्या, नंतर ती संख्या ३२ पर्यंत कमी झाली. शेवटच्या टप्प्यात ३० जागांवर काँग्रेस तयार होईल, असे वातावरण होते. दरम्यान, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युती तुटल्याची घोषणा मुंबईत केली. त्यानंतर मात्र अजित पवारांची भाषा बदलली.