महापालिका निवडणुकीसाठीचे उमेदवारी अर्ज भरण्यास अवघे काही तास शिल्लक राहिले असताना काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा आघाडी करण्याबाबत गुरुवारी चर्चा सुरू झाली. ज्या प्रभागात आघाडी होत आहे तेथे ती करण्याचा आणि जेथे अडचण आहे, तेथे मैत्रीपूर्ण लढती करण्याचा निर्णय झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र आघाडीबाबत दोन्ही काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांकडून कोणताही निर्णय स्पष्टपणे सांगण्यात आलेला नाही. त्यामुळे दोन्ही पक्षांमधील संभाव्य बंडखोरी टाळण्यासाठीच हा सगळा खटाटोप सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे.

निवडणुकीसाठी दोन्ही काँग्रेस पक्षांनी स्वतंत्र मुलाखती घेतल्यानंतर आघाडी करण्याबाबत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून चर्चा सुरू आहे. या चर्चेत जागा वाटपाचा मुद्दा कळीचा ठरला होता. त्यामुळे कधी चर्चा फिसकटल्याचे तर कधी आघाडीबाबत सकारात्मकता दिसून येत होती. या दरम्यान, काँग्रेसच्या संसदीय मंडळाच्या बैठकीमध्ये राष्ट्रवादीबरोबर आघाडी न करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांनाही त्याबाबतची स्पष्ट कल्पना काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी दिली होती. मात्र त्या वेळी काँग्रेसकडून आघाडी आहे की नाही, याबाबत काहीच स्पष्ट करण्यात आले नव्हते. त्यामुळे आघाडी तुटण्याची औपचारिक घोषणाच बाकी असल्यामुळे इच्छुकांचे लक्षही उमेदवारी यादीकडे लागले होते. मात्र आघाडीच्या चर्चेला गुरुवारी पुन्हा एकदा नाटय़मय कलाटणी मिळाली. जातीयवादी पक्षांना दूर ठेवण्यासाठी समविचारी पक्षांनी एकत्र आले पाहिजे, या भूमिकेचा पुनरुच्चार करीत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसमवेत पुन्हा चर्चा केली. उमेदवारी अर्ज भरण्यास अवघे काही तास राहिले असताना ही चर्चा सुरू झाल्यामुळे दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांकडूनही नाराजी व्यक्त होण्यास सुरुवात झाली.

‘पुण्यात आघाडीसंदर्भात काँग्रेससमवेत चर्चा झाली आहे. त्यामुळे शहरात आघाडी होईल. शंभर जागांवर दोन्ही पक्षांचे एकमत आहे. उर्वरित जागांबाबत तिढा असल्यामुळे येथे मैत्रीपूर्ण लढती करण्याचा निर्णय झाला आहे,’ असे अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. त्यांच्या या विधानामुळे आघाडी झाली असे सांगितले जात असले, तरी काँग्रेसकडून मात्र अधिकृतपणे आघाडीबाबत कोणतीही भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही.

राष्ट्रवादी काँग्रेससमवेत चर्चा झाल्यानंतर काँग्रेसचे पदाधिकारी वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करण्यासाठी मुंबईला गेले. चर्चेनंतरच आघाडीचा निर्णय जाहीर होईल, असे सांगण्यात येत होते. मात्र अद्याप कोणताही निर्णय जाहीर न झाल्यामुळे आघाडीबाबत काय असा प्रश्न दोन्ही पक्षांमधील इच्छुकांना आहे. निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला पक्षांतराचा मोठा फटका बसला. आताही उमेदवारी न मिळाल्यास काहीजण अन्य पक्षात प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे ही संभाव्य बंडखोरी टाळण्यासाठीच आघाडीची चर्चा लांबविण्यात आल्याचे सांगितले जात आहे.