आघाडीच्या चर्चेत तूर्त १५ प्रभागांवर एकमत

महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात आघाडी करण्यासंदर्भात चर्चा सुरू झाली असली तरी काँग्रेसमधून राष्ट्रवादीसह अन्य पक्षात गेलेल्या नगरसेवकांच्या जागांवर राष्ट्रवादीने दावा केला आहे. त्याला काँग्रेसचा ठाम विरोध आहे आणि या जागा राष्ट्रवादीच्याच असल्याची आग्रही भूमिका राष्ट्रवादीने घेतली आहे. त्यामुळे आघाडीची चर्चा लांबली आहे. आघाडी करण्यासंदर्भात दोन्ही काँग्रेसमध्ये शहरातील ४१ प्रभागांपैकी १५ प्रभागांवर तूर्त एकमत झाले आहे. त्यामुळे उर्वरित जागांबाबत चर्चा करण्यासाठी पुन्हा बैठका होणार आहेत.

गेल्या काही दिवसांमध्ये काँग्रेसच्या आठ नगरसेवकांनी पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. मनसेच्या तीन नगरसेवकांनीही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने या तिन्ही उमेदवारांना उमेदवारी देण्याचे आश्वासन दिले आहे. अन्य पक्षांमधून जे राष्ट्रवादीत आले आहेत त्या जागा आघाडी करताना राष्ट्रवादीलाच मिळाव्यात, असा राष्ट्रवादीचा आग्रह आहे. मात्र पक्षांतर केलेले नगरसेवक हे काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आले होते. त्यामुळे या जागा काँग्रेसच्याच आहेत. त्या प्रभागातील मतदार काँग्रेसचाच आहे. त्यामुळे या जागा आमच्याच आहेत, अशी काँग्रेसची भूमिका आहे. या तिढय़ामुळे आघाडीची चर्चा काहीशी रखडली आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडीची चर्चा रखडली होती. राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आघाडी न करता निवडणूक स्वबळावर लढवावी, अशी काँग्रेस कार्यकर्त्यांची आग्रही मागणी होती. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने एकमेकांना जागा वाटपाचे स्वतंत्र प्रस्ताव दिल्यामुळे आघाडीची चर्चाही फिस्कटली होती. मात्र जातीयवादी पक्षांना दूर ठेवण्यासाठी समविचारी पक्षांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. सन्मानपूर्वक आघाडी करण्याबाबत आमची तयारी आहे, असे सांगत राष्ट्रवादीचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आघाडी करण्याचे स्पष्ट संकेत दिले. त्यामुळे दोन्ही पक्षातील आघाडी दृष्टिपथात आली आहे, असे वाटत असतानाच काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेल्या आणि त्यानंतर अन्य पक्षात गेलेल्या नगरसेवकांच्या जागांवर राष्ट्रवादीने दावा केल्यामुळे आघाडीची चर्चाही रखडली आहे. आघाडीसंदर्भात मंगळवारी रात्री उशिरा दोन्ही पक्षाच्या प्रमुखांची बैठक झाली. त्यामध्ये पंधरा प्रभागांवर एकमत झाले.

कार्यकर्त्यांना आघाडी नको!

प्रभाग रचनेत बदललेल्या आरक्षणांमुळे काही प्रभागात दोन्ही पक्षांचे उमेदवार आमने-सामने येत आहेत. अशा काही मोजक्या जागा असून तेथे मैत्रीपूर्ण लढत करण्याच्या प्रस्तावावरही चर्चा होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरच आघाडीची चर्चा सुरू असली तरी आघाडी करून काँग्रेसला कोणताही फायदा होणार नाही, त्यामुळे आघाडी करू नये, आघाडीबाबत जो काही निर्णय घ्यायचा तो तत्काळ घ्यावा, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून होत आहे.

युतीनंतरच आघाडीचा निर्णय

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आघाडी करण्याबाबत अनुकूल वातावरण आहे, युतीवर आघाडीचा निर्णय अवलंबून नाही, असे दोन्ही पक्षांचे नेते सांगत असले तरी युतीच्या निर्णयानंतरच आघाडीचा निर्णय होण्याची शक्यता आहे. भारतीय जनता पक्ष-शिवसेना यांच्यात युती झाली नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस यांचीही आघाडी होणार नाही, अशी चर्चा आहे. युती संपुष्टात आली, तर काँग्रेसच्या आडमुठे पणावर बोट ठेवून आघाडी तुटण्याला त्या पक्षाला जबाबदार धरण्याच्या हालचालीही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू आहेत.