कॉंग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सदस्यांनी केलेल्या मदतीमुळे पुणे महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदी गुरुवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेविका अश्विनी कदम यांची निवड झाली. त्यांनी भाजपच्या नगरसेविका मुक्ता टिळक यांचा १२ विरुद्ध ४ मतांनी पराभव केला. दरम्यान या निवडणुकीमुळे पुण्यात कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि मनसे यांच्या युतीचा नाव पॅटर्न उद्याला आला आहे. स्थायी समितीच्या अध्यक्षपदी निवडल्या गेलेल्या अश्विनी कदम या तिसऱया महिला नगरसेविका आहेत.
सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीने स्वतंत्र उमेदवार उभे केल्यामुळे या निवडणुकीकडे पुण्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. अखेर कॉंग्रेसचे चंद्रकात ऊर्फ चंदूशेठ कदम यांनी ऐनवेळी माघार घेतली आणि अश्विनी कदम व मुक्ता टिळक यांच्यात सरळ लढत झाली. या लढतीमध्ये राष्ट्रवादीच्या सहा, कॉंग्रेसच्या तीन आणि मनसेच्या तीन सदस्यांनी अश्विनी कदम यांच्या बाजूने मतदान केले. वास्तविक केवळ राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस या दोन्ही सदस्यांनी केलेल्या मतदानाच्या आधारेही अश्विनी कदम विजयी ठरल्या असत्या. मात्र, मनसेनेही त्यांच्या पारड्यात मत टाकल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
स्थायी समितीसाठी मनसेला नाशिकमध्ये राष्ट्रवादीची मदत आवश्यक असून त्या मोबदल्यात मनसे पुण्यात राष्ट्रवादीला मदत करेल अशी चर्चा निवडणुकीआधी होती. ती खरी ठरल्याचे निवडणुकीनंतर स्पष्ट झाले.
अश्विनी कदम आणि उपमहापौर आबा बागूल हे महापालिकेच्या एकाच प्रभागातून निवडून आले आहेत. एकाच प्रभागातून निवडून आलेल्या दोघांकडे महापालिकेतील दोन महत्त्वाची पदे जाण्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.