पुणे महापालिकेत आघाडी करताना राष्ट्रवादी काँग्रेसने जो शब्द दिला होता, तो त्या पक्षाने पाळलेला नाही. महापालिकेत राष्ट्रवादीने मनसेबरोबर आघाडी केली आहे. त्यामुळे महापालिकेतील सत्तेत यापुढे राष्ट्रवादीशी आघाडी नकोच, असा आग्रह काँग्रेसच्या नगरसेवकांनी मंगळवारी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे धरला.
महापालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादीने विविध समित्यांच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीत मनसेबरोबर आघाडी केल्यामुळे यापुढे काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी ठेवू नये, असा निर्णय त्याच दिवशी काँग्रेसने घेतला. त्या बरोबरच आघाडी तोडत असल्याचे पत्रही काँग्रेसचे महापालिकेतील गटनेता अरविंद शिंदे यांनी प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांना पाठवले होते. पक्षाचे पदाधिकारी व नगरसेवक मंगळवारी मुंबईत चव्हाण यांच्या भेटीसाठी गेले होते. या बैठकीत चव्हाण यांनी नगरसेवकांबरोबर चर्चा करून त्यांचे मत ऐकून घेतले. उपमहापौर आबा बागूल, शहराध्यक्ष अभय छाजेड, गटनेता अरविंद शिंदे यांच्यासह पक्षाचे नगरसेवक या वेळी उपस्थित होते.
महापालिकेची निवडणूक झाल्यानंतर सन २०१२ मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येऊन सत्तेत आघाडी केली. ही आघाडी करताना महापालिकेतील पदांचे दोन पक्षांमध्ये ज्या पद्धतीने वाटप ठरले होते, तो शब्द राष्ट्रवादीने पाळला नाही, अशी तक्रार या भेटीत सर्व नगरसेवकांनी चव्हाण यांच्याकडे केली. स्थायी समितीचे अध्यक्षपद काँग्रेसला देण्याबाबत निश्चित झालेले असतानाही राष्ट्रवादीने हे पद दिले नाही, याकडेही नगरसेवकांनी चव्हाण यांचे लक्ष वेधले. समित्यांच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने मनसेबरोबर आघाडी केली आणि ही आघाडी करताना काँग्रेसशी चर्चा देखील केली नाही. त्यामुळेच यापुढे राष्ट्रवादीबरोबर महापालिकेतील सत्तेत आघाडी नको, अशी भूमिका नगरसेवकांनी मांडली. राष्ट्रवादीबरोबर आघाडी करण्याऐवजी महापालिकेत काँग्रेसने स्वतंत्रपणे काम करावे, त्याचा महापालिका निवडणुकीत पक्षाला फायदा होईल, असेही या वेळी सांगण्यात आले.
नगरसेवकांची बाजू ऐकून घेतल्यानंतर अशोक चव्हाण यांनी सांगितले, की शहरातील आजी-माजी आमदार तसेच अन्य पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून आघाडीबाबतचा निर्णय येत्या पंधरा दिवसांत घेतला जाईल.