राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

महापालिका निवडणुकीला अवघ्या काही महिन्यांचा कालावधी बाकी असतानाच कार्यकर्त्यांच्या भाजप प्रवेशाने सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का बसणार आहे. दरम्यान, प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर पक्षांतराच्या प्रक्रियेस आणखी वेग येण्याची शक्यता हे.

महापालिकेची निवडणूक पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात होणार आहे. निवडणूक पाच महिन्यांवर आल्यामुळे काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी आणि मनसेच्या काही नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर मात्र त्यांनी घूमजाव केले होते. दरम्यान, बुधवारी काँग्रेसचे राघवेंद्र उर्फ बापू मानकर, राष्ट्रवादीचे शिवाजीनगर विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष आणि माजी महापौर सुरेश शेवाळे, खडकवासला मतदार संघाचे माजी सरचिटणीस दिलीप वेडे-पाटील यांच्यासह धनकवडी येथील गणेश िभताडे आणि वडगांवशेरी येथील शैलेश बनसोडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, पश्चिम महाराष्ट्राचे संघटन मंत्री रवी अनासपुरे, शहराध्यक्ष योगेश गोगावले, जिल्हाध्यक्ष आणि आमदार बाळा भेगडे, भीमराव तापकीर आदी या वेळी उपस्थित होते.