भाजप-शिवसेनेचे काहीही होवो, काँग्रेस-राष्ट्रवादीसह मित्र पक्षांची महाआघाडी होणारच, अशी घोषणा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. त्यानुसार, लोकसभेसाठी मावळ व शिरूर लोकसभेचा मतदारसंघ राष्ट्रवादीकडेच राहणार असून विधानसभेसाठी चिंचवड, पिंपरी, भोसरी व मावळ विधानसभेवरही राष्ट्रवादीचाच दावा राहणार आहे. त्यामुळे प्रस्तावित महाआघाडीत काँग्रेसला पिंपरी-चिंचवडमध्ये ठेंगाच मिळण्याची चिन्हे आहेत.

केवळ लोकसभाच नव्हे तर विधानसभेसाठी काँग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी होणार असल्याचे अजित पवार यांनी नुकतेच पिंपरीत स्पष्ट केले. त्यानुसार मावळ व शिरूर लोकसभेसाठी राष्ट्रवादीचा दावा यंदाही कायम राहणार असल्याचे दिसते. गेल्या लोकसभा निवडणुकीत मावळातून राहुल नार्वेकर व शिरूरमधून देवदत्त निकम राष्ट्रवादीचे उमेदवार होते. दोघांना शिवसेना उमेदवारांकडून दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते. आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीकडे तगडे उमेदवार असल्याचे सांगत दोन्हीकडे राष्ट्रवादीचेच खासदार निवडून येतील, असा दावा पवारांनी केला आहे. त्यामुळे तेथे काँग्रेसचा विचारही होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी चिंचवड, पिंपरी, भोसरी व मावळ या चारही मतदारसंघांवर राष्ट्रवादीचा दावा आहे. गेल्या वेळी दोन्ही काँग्रेसमध्ये आघाडी नव्हती. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार आमने-सामने लढले होते. सर्व ठिकाणी राष्ट्रवादीच्या उमेदवारांना काँग्रेसपेक्षा खूपच जास्त मते मिळाली होती. आगामी निवडणुकीत महाआघाडी होण्याची शक्यता आहे. वाटपात या जागा आपल्याला मिळाव्यात, असा दोन्ही काँग्रेसचा आग्रह राहणार आहे. मात्र, आमची ताकद जास्त आहे, असा युक्तिवाद करत राष्ट्रवादीने आतापासून या मतदारसंघावर दावा केला आहे. पुणे जिल्ह्य़ाच्या राजकारणात काँग्रेसने कायम धाकटय़ा भावाची भूमिका घेतली आहे, तेच राष्ट्रवादीच्या पथ्यावर पडत आले आहे. त्यामुळे याही वेळी काँग्रेसच्या हाती काहीच लागणार नाही, अशी स्पष्ट चिन्हे आहेत. विधानसभेच्या चारही जागांवर राष्ट्रवादीचा डोळा असला, तरी काँग्रेसकडून चिंचवड आणि पिंपरी मतदारसंघावर दावा केला जाऊ शकतो.