इंदापूर नगरपालिकेतील सत्ता टिकवण्यासाठी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे आणि नगरपालिकेची सत्ता मिळवण्यासाठी आमदार अजित पवार यांच्यासह भाजपाचे निकराचे प्रयत्न सुरू आहेत. इंदापूर नगराध्यक्षपदासाठी सात तर नगरसेवक पदाच्या सतरा जागांसाठी सत्याहत्तर उमेदवार रिंगणात उतरले आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत हर्षवर्धन पाटील यांचा पराभव झाल्यानंतर अनेक राजकीय पक्षांच्या महत्त्वाकांक्षा वाढल्या आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसने इंदापूरचे हर्षवर्धन पाटील यांचे कट्टर राजकीय विरोधक प्रदीप गारटकर यांची पत्नी अनुराधा यांना तर सत्तारूढ काँग्रेसने इंदापुरातील काँग्रेसचे कट्टर समर्थक मुकुंद शहा यांची पत्नी अंकिता यांना नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी दिली आहे.

सत्ताधारी व विरोधी गटाला बहुजन मुक्ती पार्टीतून माजी नगराध्यक्षा अलका ताटे व भारतीय जनता पक्षाच्या माजी नगराध्यक्ष नलिनी िशदे यांनी आव्हान दिले आहे. या चारही उमेदवारांसमोर डॉ. सविता कदम (अपक्ष) यांचे आव्हान मानले जाते. मनीषा पोळ, शामतबी पठाण याही नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवत आहेत.

इंदापूर नगरपालिकेत एकूण निकालाच्या विरुद्ध नगराध्यक्षपदाचा निकाल लागेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. इंदापूर नगरपालिकेत गेली दहा वष्रे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची सत्ता आहे. त्या आधी पाटील राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्री असताना तत्कालीन पतितपावन संघटनेच्या प्रदीप गारटकर यांनी पाटील यांची नगरपालिकेत डाळ शिजू दिली नव्हती. गारटकर यांनी राष्ट्रवादीतून पाटील यांना आव्हान दिले आहे. नगरसेवकपदासाठी आठ प्रभागांतून सत्याहत्तर उमेदवार निवडणुकीच्या िरगणात आहेत.

यामधे काही विद्यमान तर अनेक नवखे उमेदवार निवडणूक लढवत आहेत. एके काळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांचा त्यांच्या पक्षाच्या प्रचारार्थ राज्यभर दौरा होत असे.

मात्र राज्यातील आघाडीची सत्ता गेल्यानंतर पाटील यांना इंदापुरात तर पवार यांना बारामतीत मतदारांनी खिळवून ठेवले असून आपापल्या गावच्या नगरपालिकेतील सत्ता राखण्यासाठी दोघांनी कंबर कसली आहे. प्रदीर्घ काळानंतर राज्यात भाजपाची सत्ता आल्यानंतर प्रथमच भारतीय जनता पक्षाने बारामती, इंदापूरवर लक्ष केंद्रित केले आहे.

बारामतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही सभा झाली. सर्वच पक्षांनी आरोप-प्रत्यारोप करत ही निवडणूक प्रतिष्ठेची केली असली, तरी मतदारांनी त्यांचा कौल अद्यापही कळू दिलेला नाही. इंदापुरात विधानसभा निवडणुकीनंतर कृषी उत्पन्न बाजार समितीवर वर्चस्व प्रस्थापित केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला इंदापूर गडावर शिक्कामोर्तब करायचे आहे. त्या दृष्टीने राष्ट्रवादीचे प्रयत्न आहेत. हर्षवर्धन पाटील यांना इंदापूर गडावर त्यांचे निशाण फडकवायचे आहे. भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात स्थान निर्माण करणे महत्त्वाचे असल्याने सर्व राजकीय पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे.