पुण्याच्या मावळ तालुक्यात गुरूवारी एक अनोखा विवाह सोहळा पार पाडला. येथील कामशेत परिसरातील या प्रेम विवाहाची सध्या राज्यभरात चांगलीच चर्चा रंगली आहे. प्रशासनाच्या उदासीन कारभाराचा निषेध करण्यासाठी नागरिकांनी चक्क चि. बांधकाम विभाग आणि चि.सौ.का. रस्त्यावरील खड्डेताई यांचे लग्न लावून दिले. साहजिकच हा आगळावेगळा विवाह पाहण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिकांनी मोदी गर्दी केली होती.

कामशेत गावात गेल्या काही दिवसांपासून खडड्यांचे साम्राज्य पाहण्यास मिळत आहे. याबद्दल नागरिकांनी वारंवार तक्रारही केली. मात्र, बांधकाम विभागाकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळेच युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आज अनोख्या पद्धतीने आंदोलन करून बांधकाम विभागाच्या कारभाराचा निषेध केला. मावळमध्ये दरवर्षीप्रमाणे मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे रस्त्यावर नेहमीप्रमाणे खड्डे पडले आहेत. बांधकाम विभागाने खड्डे बुजवल्यावर अवघ्या काही दिवसांमध्ये लगेच नवे खड्डे तयार होतात. त्यामुळे बांधकाम विभाग आणि खड्ड्यांचे प्रेमसंबंध असावेत, अशी टीका करत काँग्रेसने आंदोलन केले.

या शाही विवाहासाठी कामशेतमध्ये जय्यत तयारी करण्यात आली होती. पारंपरिक वाद्यांच्या तालावर वधू चि. सौ.का. रस्त्यावरील खड्डे ताई आणि वर चि. बांधकाम विभाग यांची गावातून मिरवणूक काढण्यात आली. ट्रॅक्टरमधून काढलेल्या या वरातीकडे गावातील सर्व लहान-थोर मंडळी कुतूहलाने पाहात होती. त्यानंतर दुपारी बाराच्या मुहूर्तावर पारंपरिक पद्धतीने त्यांचा विवाह लावण्यात आला. या लग्नातील वऱ्हाडीदेखील अनेकांच्या चर्चेचा विषय होता. खडी, वाळू, सिमेंट, मुरूम यांचा वऱ्हाडी म्हणून लग्नपत्रिकेत उल्लेख करण्यात आला होता.