वर्धापनदिनीच काँग्रेसला खिंडार

काँग्रेस पक्षाच्या वर्धापनदिनाचा मुहूर्त साधून काँग्रेसच्या सात नगरसेवकांचा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी राष्ट्रवादीत प्रवेश घडवून आणला. काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष भाऊसाहेब भोईर, पिंपरी पालिकेतील विरोधी पक्षनेते राहुल भोसले यांच्यासह या सात नगरसेवकांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचेच नेतृत्व मानणारा हा गट मोक्याच्या क्षणी राष्ट्रवादीत दाखल झाल्याने चव्हाण यांना धक्का बसला आहे. तर, शहराध्यक्ष सचिन साठे यांचा मार्ग मोकळा झाला आहे.

भाऊसाहेब भोईर, राहुल भोसले, विनोद नढे, गणेश लोंढे, विमल काळे, शकुंतला बनसोडे, गीता मंचरकर या सात नगरसेवकांनी पिंपरी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे यांना भेटून आपापले राजीनामे सादर केले आहेत. ‘वैयक्तिक कारणास्तव’ राजीनामा देत असल्याचे स्वतंत्र पत्र प्रत्येक नगरसेवकाने दिले आहे.

पुण्यात बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यस्तरीय बैठकीत या नगरसेवकांना पवार तसेच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश देण्यात आला. भोईर काँग्रेसमध्ये असतानाही अजित पवारांशी त्यांचे कमालीचे ‘सख्य’ होते. ‘राष्ट्रवादीधार्जिणे’ अशी टीका त्यांच्यावर सातत्याने होत होती. भोईर राष्ट्रवादीत जाणार, याची चर्चा गेल्या कित्येक महिन्यांपासून होती. तथापि, अजित पवार योग्य ‘टायिमग’ च्या प्रतीक्षेत होते.

त्यानुसार, पालिका निवडणुकीच्या गरमागरमीत आणि काँग्रेसचा १३० वा वर्धापनदिन साजरा होत असताना काँग्रेसला खिंडार पाडण्याची खेळी राष्ट्रवादीने केली. आतापर्यंत भोईर गट अशोक चव्हाण यांच्यावर विसंबून होता. भोईर आपला शब्द ऐकतील आणि काही केल्या पक्ष सोडणार नाहीत, असा चव्हाणांना विश्वास होता. तथापि, भोइरांनी चव्हाणांपेक्षा पवारांवर विश्वास ठेवून समर्थकांसह राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यामुळे राष्ट्रवादीचे बळ वाढणार आहे.

या सर्व नगरसेवकांना आगामी निवडणुकीसाठी राष्ट्रवादीची उमेदवारी हवी आहे. त्यानुसार, भोईर, भोसले यांच्या उमेदवारीवर यापूर्वीच शिक्कामोर्तब झाले आहे.

राष्ट्रवादीत गेलेले नगरसेवक

भाऊसाहेब भोईर, राहुल भोसले, विनोद नढे, गणेश लोंढे, विमल काळे, शकुंतला बनसोडे, गीता मंचरकर या सात नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. याशिवाय, माजी नगरसेवक राजेंद्र साळुंके भाजपला सोडचिठ्ठी देऊन पुन्हा राष्ट्रवादीत दाखल झाले आहेत. भोसरीतील काँग्रेसचे नगरसेवक जालिंदर शिंदे देखील काँग्रेस सोडण्याच्या मन:स्थितीत आहेत. ते आमदार महेश लांडगे यांचे समर्थक मानले जातात. भाजप की राष्ट्रवादीत जाणार, याविषयी त्यांनी अधिकृतपणे घोषणा केली नाही.