महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्याचे पडसाद भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या कार्यक्रमात नाही, तर कार्यक्रमानंतर आम आदमी पक्षाच्या आंदोलनामध्ये उमटले. आप आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये घोषणायुद्ध रंगले. तर, काँग्रेसतर्फे शहा यांना काळे झेंडे दाखवून निदर्शने करण्यात आली. त्यामुळे झाशीची राणी लक्ष्मीबाई चौकामध्ये काही काळ बाहतुकीची कोंडी झाली होती.
महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचा केवळ राजीनामा घेऊन उपयोगाचा नाही, तर त्यांच्या व्यवहारांची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी करीत आप कार्यकर्त्यांनी झाशीची राणी लक्ष्मीबाई चौकामध्ये निदर्शने केली. अमित शहा यांच्या कार्यक्रमानंतर बाहेर पडलेले भाजपचे कार्यकर्ते आणि आपचे कार्यकर्ते यांच्यामध्ये काही काळ घोषणायुद्ध रंगले. ‘मोदी, मोदी’ अशा घोषणांचा गजर करणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांपैकी काहींनी आप कार्यकर्त्यांच्या हातातील फलक हिसकावून घेतले. त्यांनी आपच्या कार्यकर्त्यांना रेटत मागे जाण्यास भाग पाडले. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करून या दोन पक्षांच्या कार्यकर्त्यांमधील अंतर वाढविले आणि आपच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन तेथून हलविले. दुपारनंतर या कार्यकर्त्यांना सोडून देण्यात आले. केंद्रातील आणि राज्यातील भ्रष्टाचारी मंत्र्यांनी राजीनामे द्यावेत, या प्रमुख मागणीसीठी काँग्रेस पक्षातर्फे शहराध्यक्ष रमेश बागवे यांच्या अध्यक्षतेखाली अमित शहा यांना काळे झेंडे दाखवून निदर्शने करण्यात आली. आमदार दीप्ती चवधरी, अरिवद शिंदे, अभय छाजेड, अजित आपटे, सुधीर जानजोत, अविनाश बागवे यामध्ये सहभागी झाले होते.