करोनाकाळात रहिवाशांना दिलासा

पुणे : वैभवशाली परंपरा असणाऱ्या पुण्यातील गणेशोत्सवावर यंदा करोनाचे सावट आहे. यंदाच्या वर्षी गणेशोत्सव अतिशय साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय बहुतांशी मंडळांनी घेतला आहे. गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वी दीड महिना आधी नदीपात्रातील रस्त्यावर ढोल-ताशा पथकांचा सराव सुरू होतो. यंदाच्या वर्षी करोनामुळे ढोल ताशांचा पथकांच्या सरावावर बंदी असल्याने दणदणाटापासून रहिवाशांना दिलासा मिळाला आहे.

गणेशोत्सवापूर्वी साधारणपणे ढोल-ताशा पथकांचा सराव नदीपात्रातील रस्त्यावरील मोकळ्या जागेत सुरू होतो. एरंडवणे येथील डीपी रस्त्यावरील मंगल कार्यालयांच्या आवारात सरावासाठी जागा उपलब्ध करून दिली जाते. राजकीय नेते, चित्रपट अभिनेत्यांच्या उपस्थितीत दरवर्षी पथकांकडून सरावाचा आरंभ केला जातो. उत्सवापूर्वी दीड महिने दररोज सायंकाळी ढोल-पथकांचा सराव सुरू झाल्यानंतर नदीपात्रातील रस्ता तसेच एरंडवणे परिसरातील रहिवाशांना दणदणाटामुळे त्रासाला सामोरे जावे लागते. या भागातील रहिवाशांकडून तक्रारीं करण्यात येतात. दणदणाटामुळे ज्येष्ठ नागरिकांना त्रास होतो. यंदाच्या वर्षी करोनाच्या संसर्गामुळे पथकांच्या सरावावर बंदी असल्याने रहिवाशांना दिलासा मिळाला आहे.

प्रतिष्ठापना आणि विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या पथकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. शहरातील नदीपात्रातील रस्ता, एरंडवणे डीपी रस्त्यासह कोथरूड, सिंहगड रस्ता, पद्मावती, बिबवेवाडी, वारजे, कात्रज अशा उपनगरात पथकांची संख्या वाढीस लागली आहे. पथकांकडून दरवर्षी युवक-युवतींना ढोल-ताशा वादनाचे प्रशिक्षण देण्यात येते. महाविद्यालयीन युवक-युवती मोठय़ा संख्येने पथकात सहभागी होतात. सरावाला येणाऱ्या युवक-युवतींच्या गाडय़ा रस्त्यावर लावण्यात येतात तसेच सराव पाहण्यासाठी अनेकजण जमतात. त्यामुळे दरवर्षी नदीपात्र आणि एरंडवणे भागातील रस्त्यावर कोंडी झाल्याचे पाहायला मिळते. वाहतूक कोंडी, बेशिस्त पद्धतीने लावण्यात येणाऱ्या दुचाक्यांमुळे वाहतूक कोंडी होते, अशाही तक्रारी करण्यात येतात. यंदाच्या वर्षी मात्र सरावावर बंदी असल्याने दणदणाटापासून नागरिकांची सुटका झाली आहे.

करोनाचा संसर्गात परवानगी नाही

यंदाच्या वर्षी ढोल-ताशा पथकांच्या सरावासाठी नदीपात्रातील मोकळ्या जागेत परवानगी मिळावी, असे अर्ज पोलिसांकडे आले नाहीत. तशी परवानगी देखील पथकांकडून मागण्यात आली नाही. यंदा करोनाचा संसर्ग असल्याने परवानगी देता येणार नाही. नदीपात्रातील मोकळ्या जागेत सरावासाठी महापालिका आणि पोलिसांकडून परवानगी देण्यात येते, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.