शहरातील विविध संघटना, संस्थांनी बुधवारी ६५ वा संविधान दिवस साजरा केला. विविध उपक्रमांच्या माध्यमातून विविध संस्थांनी संविधान आणि त्यातील तत्वांचा प्रसार केला. संविधानेचे रक्षण करण्याची शपथ संघटनांनी या वेळी घेतली.
भरिप बहुजन महासंघातर्फे संविधान दिनी जाहीर सभा घेण्यात आली. ‘भारताची धर्मनिरपेक्ष, विज्ञानवादी, विवेकवादी घटना बदलण्याचा प्रयत्न सध्याचे सरकार करत असल्याचे मत भारिप बहुजन महासंघाचे युवा आघाडीचे शहराध्यक्ष उमेश चव्हाण यांनी व्यक्ते केले. पुणे शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीतर्फेही संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी अ‍ॅड. अभय छाजेड यांनी ‘भारतीय राज्य घटनेचे महत्व’ या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. बोधिवृक्ष मॉर्निग वॉक ग्रुपतर्फे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात कुलगुरू वासुदेव गाडे यांच्या उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
 फुले, शाहू, आंबेडकर विचारमंचातर्फे गिर्यारोहक आनंद बनसोडे यांचा सन्मान करण्यात आला. फेसबुक आंबेडकराईट्सतर्फे विविध संस्थांना संविधानाचे प्रास्ताविक भेट देण्यात आले. वरप्रभ शिरगावकर (चार्ली) यांनी अरूण ओव्हाळ, डॉ. दिनेश मेट्टेल्लु, रवी ओव्हाळ यांच्यासमवेत संविधानाविषयी जनजागृती केली. ‘दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया’तर्फे दत्तवाडी व म्हसोबा चौकात संविधान दिनानिमित्त संविधानाविषयी माहिती देण्यात आली.