कामगार दिनानिमित्त विशेष उपक्रम

पुणे : माझे वडील भाजी विक्रेते आहेत, पण मला मोठे झाल्यावर डॉक्टर व्हायचे आहे, असे म्हणणारा राहुल. माझे वडील मोलमजुरी करतात, पण मला पोलीस व्हायचे आहे, असे सांगणारी प्रियांका. माझे वडील बांधकामांवर गवंडी म्हणून काम करतात पण मला चार्टर्ड अकाउंटंट व्हायचे आहे, असे सांगणारी वैष्णवी. मोलमजुरी करणाऱ्या अनेक गरीब पालकांच्या मुलांनी मंगळवारी आकाशवाणीला भेट दिली तेव्हा हे मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमात चार भिंतीबाहेरच्या जगाचा अनुभव त्यांनी घेतला.

निमित्त होते कामगार दिनानिमित्त आकाशवाणी पुणे परिवार आणि डोअरस्टेप स्कूलतर्फे आयोजित करण्यात आलेल्या स्नेहमेळाव्याचे. बांधकामावर गवंडी म्हणून काम करणाऱ्या, मोलमजुरी करणाऱ्या किंवा भाजीविक्री सारखे छोटे व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या पालक आणि मुलांनी आकाशवाणीला भेट देऊन रेडिओचे काम कसे चालते ते पाहिले. झोपडपट्टीत राहणारी, आपल्या पालकांना त्यांच्या कामामध्ये हातभार लावून शाळेत शिकणाऱ्या ६० मुलांनी या उपक्रमात सहभाग घेतला.

पुणे आकाशवाणी केंद्राचे प्रमुख आशिष भटनागर यांनी या वेळी या मुलांशी संवाद साधत पुढील शिक्षण घेण्यासाठी त्यांना प्रेरणा दिली. भटनागर म्हणाले, या मुलांनी केवळ स्वतसाठी नव्हे तर आपल्या कष्टकरी पालकांचे जीवनमान उंचावण्यासाठी तसेच त्यांना योग्य तो सन्मान मिळवून देण्यासाठी चांगले शिक्षण घेऊन मोठे होणे गरजेचे आहे. आकाशवाणी पुणे परिवाराचे रवींद्र रांजेकर म्हणाले, कष्टकऱ्यांच्या कष्टाला सलाम करण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. कष्ट करून शिकणारी ही मुले त्यांच्या पालकांबरोबरच देशाचे भवितव्य घडवण्यासाठी हातभार लावणार आहेत. म्हणूनच आकाशवाणीसारख्या माध्यमाशी त्या मुलांना जोडून त्यांच्यासाठी शिक्षण आणि मनोरंजनाची दारे उघडण्यासाठी हा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला.

स्नेहमेळाव्यानिमित्त आलेली मुले प्रथमच आकाशवाणीमध्ये आली होती. त्यामुळे येथे चालणाऱ्या कामाबद्दल त्यांना औत्सुक्य होते. शिक्षणाचे महत्त्व आणि सबलीकरण या विषयावरील माहितीपटही या वेळी दाखवण्यात आला. आकाशवाणीच्या वृत्त निवेदिका मृदुला घोडके यांनी मुलांशी संवाद साधला. सामाजिक बांधिलकीचा भाग म्हणून आकाशवाणी कर्मचाऱ्यांकडून या मुलांना रेडिओ संच भेट म्हणून देण्यात आले.