पुणे परिसरातील बांधकाम क्षेत्रात वेगाने वाढ झाली आहे. मात्र, घरे खरेदी करताना बांधकाम व्यावसायिकाकडून अनेकांची  फसवणूक केल्याचे समोर आले. ज्या नागरिकांच्या सदनिकेचे दर वीस लाखांच्या वर होते. त्यांना बांधकाम व्यावसायिकाच्या विरोधात राज्य ग्राहक मंचाकडे तक्रार करावी लागत होती. त्यासाठी मुंबईला जावे लागत होते. मात्र, आता या तक्रारदारांना मुंबईला जाण्याची गरज पडणार नाही.. कारण पुणे, कोल्हापूर, नाशिक आणि अमरावती या चार ठिकाणी राज्य ग्राहक मंचाची खंडपीठे लवकरच सुरू होणार आहेत. जिल्हा ग्राहक मंचाच्या निर्णयाला आव्हान देण्यासाठी मुंबईला जावे लागणाऱ्यांची धावपळही या निर्णयामुळे टळणार आहे.
नागरिकांमध्ये ग्राहक कायद्यामध्ये अलीकडे चांगलीच जागृती झाली आहे. फसवणूक झाल्याचे समजताच अनेक नागरिक ग्राहक मंचाकडे धाव घेऊ लागले आहेत. त्यांना ग्राहक मंचाकडून न्याय देखील मिळू लागला आहे. जिल्हा ग्राहक मंचाकडे वीस लाखापर्यंत किमतीपर्यंतचे दावे दाखल करता येतात. पण, त्यापेक्षा दावे दाखल करण्यासाठी मुंबईला जावे लागत होते. पुणे शहर हे झपाटय़ाने वाढत असून बांधकाम क्षेत्रदेखील वेगाने वाढत आहे. सदनिकांच्या सध्याच्या वाढलेल्या किमती पाहता बांधकाम व्यावसायिकांच्या विरोधातील बहुतांश दावे हे वीस लाखांच्या पुढील असतात. त्यामुळे या संदर्भात पुण्यातील जिल्हा ग्राहक न्यायमंचाकडे दाद मागता येत नसे. त्यासाठी ग्राहकांना मुंबईला राज्य न्यायमंचाकडे जावे लागे. या गैरसोयीमुळे अनेक जण कंटाळून जायचे. काहीजण खटला लढण्याऐवजी तडजोड करणे पसंत करायचे. मात्र, आताच्या नव्या निर्णयामुळे नागरिकांना राज्य ग्राहक मंचाच्या पुण्यात होणाऱ्या खंडपीठात दावे दाखल करता येणार आहेत. त्याबरोबरच जिल्हा ग्राहक मंचाने दिलेल्या निकालाच्या विरोधात अपील करण्यासाठीसुद्धा मुंबईला जावे लागणार नाही.
राज्य ग्राहक मंचाने याबाबत नुकतेच परिपत्रक काढले आहे. यामध्ये जिल्हा ग्राहक मंचाचे रजिस्टार हेच राज्य ग्राहक मंचाच्या खंडपीठाचे काम पाहणार आहेत. राज्य ग्राहक आयोगापुढे प्रलंबित असलेले दावे या खंडपीठांकडे वर्ग केले जाणार आहेत. पुण्यातील राज्य ग्राहक मंचाच्या खंडपीठापुढे पुणे ग्राहक मंच, जिल्हा ग्राहक मंच आणि सोलापूर येथील दावे ठेवले जाणार आहेत. तर, कोल्हापूर येथील ग्राहक खंडपीठापुढे कोल्हापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथील दावे चालविले जातील. नाशिक ग्राहक खंडपीठापुढे नाशिक, नंदूरबार आणि धुळे येथील दावे ठेवले जाणार आहेत. तर, अमरावती ग्राहक खंडपीठापुढे अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा आणि यवतमाळ जिल्हा ग्राहक मंचाचे दावे चालविले जाते. राज्य ग्राहक मंचाच्या खंडपीठांसमोर ठेवल्या जाणाऱ्या दाव्यांची यादी प्रत्येक खंडपीठासमोर लावली जाणार आहे. त्याबरोबरच संबंधित वकील, पक्षकाराला याची माहिती नोटीसद्वारे दिली जाणार आहे. राज्य ग्राहक मंचाच्या या निर्णयाचे वकील, पक्षकार व वकिलांच्या संघटनांकडून स्वागत करण्यात आले आहे.