ग्राहक न्याय मंचाकडे दावा दाखल केल्यास न्याय मिळू शकतो, याची जाणीव झाल्यामुळे ग्राहक जागरुक झाले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर दुकानदार, बिल्डर, विमा, मोबाईल कंपन्या आदींच्या विरोधात ग्राहक न्यायालयात धाव घेऊ लागले. त्यामुळे ग्राहक मंचाकडे मोठय़ा प्रमाणात दावे दाखल होऊ लागले. मात्र अलीकडे, दावा दाखल केल्यानंतर त्याच्या सुनावणीला गैरहजर राहणाऱ्या तक्रारदारांची संख्या वाढू लागली आहे. गेल्या चार महिन्यात निकाली काढण्यात आलेल्या दाव्यापैकी चाळीस टक्के तक्रारदार गैरहजर असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे ग्राहक मंचाकडून असे दावे प्रलंबित ठेवण्यापेक्षा निकाली काढले जात आहेत. निकाली काढण्यात आलेले दावे हे दोन ते पाच वर्षांपूर्वीचे आहेत.
पुणे जिल्ह्य़ासाठी सातारा रस्त्यावरील पुष्पमंगल कार्यालयाजवळील एका इमारतीमध्ये ग्राहक मंचाचे काम चालते. या ठिकाणी दिवसाला साधारण ८० ते ९० दावे दाखल होतात. साधारण तेवढेच दावे निकाली काढले जातात. या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात बांधकाम व्यावसायिक, विमा कंपन्या यांच्याविरुद्ध सर्वाधिक तक्रारी दाखल होऊ लागल्या आहेत. ग्राहकांना सदोष सेवा मिळाल्यानंतर ग्राहक मंचाकडे दावा दाखल केल्यानंतर न्याय मिळू शकतो याची जाणीव झाली आहे. ग्राहक जागरुक झाल्यामुळे मंचाकडे येणाऱ्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून तक्रारी दाखल होण्याचे प्रमाण वाढले आहे.
या वर्षी जानेवारी ते एप्रिल दरम्यान ग्राहक मंचाकडे दाखल असलेले ३६३ दावे निकाली काढण्यात आले आहेत. त्यामध्ये तब्बल १०६ दाव्यात तक्रारदार हजर नसल्याचे आढळून आले आहे. या दाव्यातील तक्रारदारांना वारंवार नोटीस पाठवून हजर राहण्याचे आदेश दिल्यानंतरही अनेक तारखांना ते गैरहजर राहत आहेत. त्यामुळे मंचाने प्रलंबित दावा राहू नये म्हणून सतत गैरहजर राहणाऱ्या तक्रारदारांचे दावे निकाली काढले आहेत. साधारण दोन ते पाच वर्षांपूर्वीच्या दाव्यांचा यामध्ये समावेश आहे. तर, तक्रारदार आणि जाब देणार यांनी ग्राहक मंचासमोर उपस्थित राहून त्यांच्यात तडजोड झाल्याचे सांगितल्यामुळे साधारण ३७ दावे निकाली काढले आहेत. त्यामुळे गेल्या चार महिन्यात निकाली काढण्यात आलेलय़ा एकूण दाव्यांपैकी चाळीस टक्के दाव्यात तक्रारदार गैरहजर आहेत, तर दहा टक्के दाव्यात तडजोड झाल्याचे दिसून आले आहे.
याबाबत ग्राहक मंचातील दाव्यांमध्ये काम करणे वकील हृषीकेश गानू यांनी सांगितले की, तक्रारदार अनेक तारखांना गैरहजर राहिल्यानंतर मंचाकडून तो दावा निकाली काढला जातो. मात्र, तक्रारदार हजर न राहण्याची वेगवेगळी कारणे आहेत. काही दाव्यांमध्ये तक्रारदार आणि जाब देणार यांच्यात बाहेर तडजोड झालेली असते. मात्र, ही माहिती ग्राहक मंचापर्यंत येत नाही. काही दाव्यात तक्रारदाराला जाब देणारे दिलेले उत्तर वाचून आपला दावा टिकणार नाही, असे वाटते. तर, काहींमध्ये तक्रारदार परगावी असल्यामुळे हजर राहू शकत नाहीत. त्याबरोबर काही दाव्यात तक्रार दाखल करेपर्यंत तक्रारदाराचा जोर असतो. पण, तक्रार दाखल केल्यानंतर पुन्हा तेवढा जोर राहत नाही. अशा विविध कारणांमुळे तक्रारदार गैरहजर राहतात, असे आढळले आहे.