News Flash

सेवा न देणाऱ्या कंपनीला एक लाख व ३० हजारांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश

नोकरीच्या मुलाखतीची माहिती देण्यासाठी ग्राहकाकडून पैसे घेऊन सेवा न देणाऱ्या क्लिक टू रिज्युमे सव्र्हिसेस प्रा. लि. या कंपनीला ग्राहक मंचाने फटकारले आहे.

| August 1, 2015 03:20 am

नोकरीच्या मुलाखतीची माहिती देण्यासाठी ग्राहकाकडून पैसे घेऊन सेवा न देणाऱ्या क्लिक टू रिज्युमे सव्र्हिसेस प्रा. लि. या  कंपनीला ग्राहक मंचाने फटकारले आहे. ग्राहकाकडून घेतलेले एक लाख सात हजार आणि नुकसान भरपाई आणि खटल्याचा खर्च म्हणून २५ हजार रुपये देण्याचे आदेश मंचाचे अध्यक्ष व्ही. पी.उत्पात यांनी दिले.
अशोक सत्यनारायण (रा. डी. ७०३, स्प्रिंग फिल्ड सोसायटी, कोथरूड) यांनी  क्लिक टू रिज्युमे सव्र्हिसेस प्रा. लि. व रिज्युमे टू जॉब सव्र्हिसेस प्रा. लि. नोयडा येथील कंपनीच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. अशोक यांना दूरध्वनीवर कंपनीकडून संदेश आला की, कंपनीकडे शुल्क भरून नोंदणी केल्यास नोकरीच्या मुलाखतीच्या कॉल्सची माहिती दिली जाईल. त्यानुसार अशोक यांनी नेट बँकिंगद्वारे कंपनीकडे अकरा हजार रुपये भरले. पैसे भरल्यानंतर सहा महिन्यांनंतर एकही त्यांना एकही कॉल आला नाही. पुन्हा कंपनीकडून त्यांना दूरध्वनी करून आणखी ३० हजार रुपये भरण्यास सांगितले. त्यावेळीही त्यांनी हे पैसे भरले. त्यानंतरही सात महिन्यांपर्यंत त्यांना कंपनीकडून नोकरीच्या माहितीचा एकही कॉल देण्यात आला नाही.
सात महिन्यांनंतर कंपनीने पुन्हा अशोक यांना फोन केला. कंपनीने त्यांना कोणतीच सेवा न दिल्यामुळे त्यांचे पैसे परत केले जातील. पण, कंपनीचे नाव आता बदलले असून ते रिझ्युमे टू डॉट कॉम झाले आहे. पूर्वी पैसे भरल्याचे दिसण्यासाठी आणखी ६६ हजार ५८२ रुपये भरा. त्यामुळे तक्रारदार यांनी ही रक्कम नेट बँकिंगद्वारे भरली. पण, त्यांना पैसे व नोकरीच्या कॉलची माहिती दिली गेली नाही. त्यामुळे कंपनीला त्यांनी ई-मेल करून विचारणा केली. त्यावेळी कंपनीकडून त्यांची नोंदच नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. एक लाख रुपये घेऊनही सेवा न दिल्यामुळे तक्रारदारांनी ग्राहक मंचाकडे धाव घेतली. मंचाने कंपनीला नोटीस बजावली. पण, कंपनीच्या वतीने कोणीही हजर झाले नाही. तक्रारदारांनी सादर केलेल्या पुराव्यांवरून त्यांनी कंपनीकडे पैसे भरल्याचे दिसून  येत असल्याचे मंचाने नमूद केले. कंपनीने तक्रारदाराला सदोष सेवा दिली असून या घटनेमुळे त्यांचा वेळ वाया जाऊन मनस्ताप झाला आहे. त्यामुळे कंपनीने त्यांच्याकडून घेतलेली रक्कम आणि २५ हजार रुपये नुकसान भरपाई आणि पाच हजार रुपये खटल्याचा खर्च द्यावा, असे मंचाने आदेशात म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 1, 2015 3:20 am

Web Title: consumer court fine case
टॅग : Consumer Court,Fine
Next Stories
1 विदेशातील युवकांना मराठी भाषेशी जोडणार
2 ‘एलबीटी’ची संभ्रमावस्था कायम
3 पारपत्र काढण्यासाठी नागरिकांची पसंती ‘तत्काळ’कडून ‘नॉर्मल’कडे!
Just Now!
X