29 September 2020

News Flash

ग्राहक मंचाचा आदेश न पाळल्याबद्दल ट्रॅव्हल्स कंपनीच्या मालकाला कैदेची शिक्षा

ग्राहकाने केलेल्या अर्जावर स्वागत ट्रॅव्हल्स कंपनीच्या मालकाला तीन महिने साधी कैद आणि नुकसान भरपाई म्हणून आणखी एक लाख १७ हजार रुपये देण्याचा आदेश मंचाचे अध्यक्ष

| February 18, 2014 03:15 am

काश्मीरची सफर घडवून आणण्यासाठी पैसे घेऊन नंतर निम्म्यातूनच पळून आलेल्या ट्रॅव्हल्स कंपनीच्या मालकाला ग्राहक मंचाने भरलेली रक्कम व्याजासह देण्याचे आदेश दिले होते. पण, आदेश देऊन दीड वर्षे झाल्यानंतरही ग्राहक मंचाच्या आदेशाचे पालन न केल्याची दखल मंचाने घेतली. ग्राहकाने केलेल्या अर्जावर ट्रॅव्हल्स कंपनीच्या मालकाला तीन महिने साधी कैद आणि नुकसान भरपाई म्हणून आणखी एक लाख १७ हजार रुपये देण्याचा आदेश मंचाचे अध्यक्ष व्ही. पी. उत्पात यांनी दिला. शिक्षा सुनावणीच्या वेळी कंपनीचा मालक हजर नसल्यामुळे त्याच्याविरुद्ध पकड वॉरन्ट काढण्यात आले आहे.
स्वागत हॉलिडेजचे मालक मोहन विष्णू मेढेकर (रा. प्रेस्टिज पॉईन्ट, शुक्रवार पेठ) अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्या ट्रॅव्हल्स कंपनीच्या मालकाचे नाव आहे. ग्राहक संगणक अभियंता केतन अनंत तारे (रा. ठाणे) यांनी ग्राहक मंचाकडे तक्रार दिली होती. तारे यांच्या वतीने त्यांचे सासरे बी. आर. हल्लूर यांनी ग्राहक मंचासमोर या दाव्यासाठी पाठपुरावा केला. तारे यांच्यावतीने अॅड. संजय गायकवाड यांनी काम पाहिले.
हल्लूर, त्यांची मुलगी आणि जावई तारे असे अकरा जण काश्मीर येथे सहलीला गेले होते. त्यासाठी त्यांनी शुक्रवार पेठेतील मेढेकर यांच्या स्वागत हॉलिडेज मार्फत बुकिं ग केले होते. या अकरा जणांस ट्रॅव्हल्स कंपनी श्रीनगर येथे घेऊन गेली. त्या ठिकाणी एका हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था केली. दोन दिवस फिरवल्यानंतर कंपनीची व्यक्ती मुंबईला पळून गेली. त्यामुळे हल्लूर व तारे यांनी स्वत: खर्च करून ही सहल पूर्ण केली. पुण्यात आल्यानंतर तारे यांच्यावतीने हल्लूर यांनी अॅड. गायकवाड यांच्यामार्फत स्वागत हॉलीडेजला नोटीस पाठवून खर्च झालेली रक्कम देण्याची मागणी केली. त्यांनी सुरूवातीला रक्कम देण्याचे मान्य केले. पण, दिलेला धनादेश न वठल्यामुळे त्यांनी ग्राहक मंचाकडे दावा दाखल केला. या दाव्यात ग्राहक मंचाने स्वागत हॉलिडेजचे मालक मेढेकर यांना ग्राहकांची एक लाख ३९ हजार रुपये व्याजासह देण्याचा २०१२ मध्ये आदेश दिला होता.
ग्राहक मंचाने आदेश देऊनसुद्धा स्वागत हॉलिडेज यांनी ग्राहकांची रक्कम परत दिली नाही. त्यामुळे तारे यांनी अॅड. गायकवाड यांच्यामार्फत ग्राहक संरक्षण कायदा कलम २७ नुसार अर्ज करून मंचाचा आदेश न पाळल्यामुळे कंपनीला शिक्षा देण्याची मागणी केली होती. त्यानुसार न्यायालयात खटला चालला. न्यायालयाने यामध्ये मेढेकर यांना दोषी ठरविले. मात्र, त्यांच्या वयाचा विचार करून तीन महिने साधी कैद, दहा हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास पंधरा दिवसांच्या कैदेची शिक्षा सुनावली. तक्रारदार यांना नुकसान भरपाई म्हणून पहिल्या रकमेव्यतिरिक्त एक लाख १७ हजार रुपये सहा आठवडय़ात देण्याचा आदेश दिला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 18, 2014 3:15 am

Web Title: consumer court orders punishment to swagat holidays
Next Stories
1 म. श्री. दीक्षित यांचे निधन
2 दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी राज्यमंडळाकडून समुपदेशन कक्ष
3 बायोइन्फर्मेटिक्स मधील संशोधनासाठी सीडॅकचे ‘परम बायोब्लेझ’
Just Now!
X