आपल्याकडेही स्मार्ट फोन असावा म्हणून त्यांनी चांगल्या कंपनीचा महागडा मोबाईल घेतला. पण, काही दिवसांतच त्यात विविध दोष निर्माण होत गेले. एकदाच नव्हे तब्बल तीन ते चार वेळा त्याची दुरुस्ती झाली, तरीही दोष कायमच राहिले.. अखेर मोबाईलचे पैसे परत देण्याचा आग्रह ग्राहकाने धरला. पण, कंपनीने दाद दिली नाही.. त्रासलेल्या या ग्राहकाला ग्राहक मंचाने न्याय दिला अन् मोबाईलची संपूर्ण रक्कम परत करण्याबरोबरच ग्राहकाला झालेल्या त्रासापोटी दहा हजार रुपयांचा दंडही कंपनीला ठोठावला.
नवी सांगवी येथील राजू अशोक तायडे यांनी सॅमसंग गॅलेक्सी ग्रॅन्ड ९०२८ हा मोबाईल २१ हजार रुपयांना खरेदी केला होता. या प्रकरणामध्ये त्यांच्या अविनाश जाधव यांनी श्री कम्युनिकेशन (धनश्री हाईट्स सोसायटी, औंध) आणि सॅमसंग इंडिया इलेक्ट्रॉनिक्स यांच्या विरोधात मंचाकडे तक्रार केली होती. त्यानुसार मंचाचे अध्यक्ष व्ही. पी. उत्पात आणि सदस्य मोहन पाटणकर, क्षितिजा कुलकर्णी यांनी दोघांनी मिळून तक्रारदार यांना मोबाईलची रक्कम परत करण्याचा आदेश दिला आहे.
तायडे यांनी घेतलेल्या मोबाईलमध्ये तीन महिन्यातच बिघाड झाल्यामुळे त्यांनी तो दुरुस्तीसाठी कंपनीचे अधिकृत सेवा केंद्र असलेल्या श्री कम्युनिकेशन यांच्याकडे दिला. त्यांनी तक्रारदार यांना मोबाईल दुरुस्त करून दिला. त्यानंतर काही दिवसांमध्येच त्यामध्ये वेगवेगळ्या समस्या निर्माण होऊ लागल्या. त्यामुळे त्यांनी मोबाईल पुन्हा दुरुस्तीसाठी दिला. त्यानंतर त्यातील होल्ड की, स्क्रोल पॅनल, चार्जिग केबल असे मोबाईलमधील कीज बदलून दिल्या. पुन्हा अचानक मोबाईल बंद पडल्यामुळे डिसप्ले बदलण्यात आला. तरीही समस्यांचे निराकरण न झाल्यामुळे मोबाईलचा मदर बोर्ड बदलण्यात आला.
मोबाईलमधील दोष दूर होऊ शकत नसल्यामुळे तक्रारदार यांनी मोबाईल बदलून देण्याची मागणी केली. त्यांनी मोबाईल व खरेदीची पावती जमा केली. त्यावेळी त्यांना मोबाईल खरेदी केलेली रक्कम परत देण्याचे आश्वासन दिले. मात्र, त्यांना नंतर मोबाईलची रक्कम परत मिळणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांनी ग्राहक मंचाकडे धाव घेतली. मंचाने श्री कम्युनिकेशन आणि सॅमसंग इंडिया इलेक्ट्रॉनिक्स यांना नोटिसा बजावल्या. मात्र, ते मंचासमोर हजर झाले नाहीत. सर्व कागदपत्रे पाहिल्यानंतर मोबाईल वॉरन्टीच्या काळात असताना आणि त्यातील दोष दूर न झाल्यामुळे मोबाईलची संपूर्ण रक्कम परत करण्याचे आदेश दोघांना मंचाने दिले आहेत.