करोना संसर्गानंतर ग्राहकांचा वाढता कल; ऑनलाइन खरेदीत काही पटींनी वाढ

पुणे : काजू कतली, पेढे,बर्फी अशी मिठाई, तसेच श्रीखंड, बासुंदीसारख्या गोड पदार्थाच्या ऑनलाइन खरेदीमध्ये काही पटींनी वाढ झाली आहे. करोना संसर्गामुळे मिठाईच्या ऑनलाइन खरेदीला मोठा प्रतिसाद मिळत असून, सणासुदीच्या पाश्र्वभूमीवर मिठाईच्या ऑनलाइन खरेदीकडे ग्राहकांचा कल असल्याचे दिसून येत आहे.

सर्वसाधारणपणे दुकानांत जाऊन, प्रत्यक्ष चव घेऊन मिठाई खरेदी के ली जाते. मात्र बदलत्या काळात व्यावसायिकांनी ऑनलाइन खरेदीची सुविधाही ग्राहकांना उपलब्ध करून दिली आहे. त्याचा उपयोग सध्याच्या करोना संसर्गाच्या काळात मोठय़ा प्रमाणात होताना दिसत आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात ऑनलाइन खरेदी उद्योजक आणि ग्राहक या दोघांच्याही सोयीची ठरत आहे. दिवाळीच्या फराळापासून मिठाई, बर्फीचे काही प्रकार ऑनलाइन मागवणे शक्य झाल्याने ऑनलाइन खरेदीचे प्रमाण वाढले असल्याचे व्यावसायिकांचे निरीक्षण आहे. त्यामुळे मिठाईच्या ऑनलाइन खरेदीचा नवा कल अधोरेखित होऊ लागला आहे. विशेष म्हणजे, करोनापूर्व काळात अत्यल्प प्रमाणात होणारी मिठाईची ऑनलाइन खरेदी आता काही पटींनी वाढल्याची माहिती व्यावसायिकांनी दिली.

काका हलवाई स्वीट सेंटरचे संचालक सचिन गाडवे म्हणाले, की मिठाईची ऑनलाइन खरेदी मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. सोनपापडी, लाडू, पेढे यांसह नमकीन पदार्थही ग्राहकांकडून ऑनलाइन मागवले जात आहेत. पुण्यासह पिंपरी चिंचवड, तळेगाव, बारामती, मुंबईतील ग्राहकांकडून आलेली मागणी पोहोचवण्यात आली आहे.

करोनामुळे ऑनलाइन खरेदीचा कल पाच ते दहा पटीने वाढला आहे. फे सबूक पेज, व्हॉट्सअ‍ॅपद्वारे ऑनलाइन मागणी नोंदवल्यावर ग्राहकांना त्यांच्या थेट घरी पदार्थ पोहोचवले जातात.  आतापर्यंत पुणे आणि परिसरासह सांगली, कोल्हापूर, मुंबईतील ग्राहकांनी ऑनलाइन खरेदी के ल्याचे मँगो स्वीट्सचे संचालक कौस्तुभ दबडगे यांनी सांगितले.

करोनापूर्व काळाच्या तुलनेत गेल्या काही महिन्यांपासून मिठाई आणि खाद्य पदार्थाची ऑनलाइन मागणी पाच पटीने वाढली आहे. ऑनलाइन खरेदी के लेल्या पदार्थाच्या गुणवत्तेबाबत आता ग्राहकांना विश्वास वाटू लागल्याने खरेदीचा कल वाढतो आहे. पेढे, गुलाबजाम, काजू कतली, आंबा बर्फी अशा जास्त काळ टिकणाऱ्या काही मिठाई-बर्फी राज्यभरात, अगदी परदेशातही पाठवण्यात आल्या आहेत. ऑनलाइन खरेदीला मिळणारा प्रतिसाद अतिशय मोठा आहे.

– इंद्रनील चितळे, भागीदार, चितळे बंधू मिठाईवाले