जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर कंटेनरच्या झालेल्या विचित्र अपघातामुळे १० गाड्यांचं नुकसान झालं असून या अपघातात एकाला आपला जीवही गमवावा लागला आहे. संध्याकाळी सहा वाजल्याच्या दरम्यान कामशेत खिंडीजवळ ही घटना घडली असून यात ५ जणं जखमी झाल्याची माहिती मिळते आहे. या अपघातामुळे जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर काहीकाळ वाहतुकीची कोंडी झालेली पहायला मिळाली.

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, एक कंटेनर लोखंडाचे जड जॉब भरुन पुण्याहून मुंबईच्या दिशेने जात होता. यादरम्यान हा कंटेनर आपली लेन मोडून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या लेनमध्ये घुसला. याचवेळी कंटेनरमध्ये ठेवलेले लोखंडी जॉब हे रस्त्यावर पडायला सुरुवात झाली. हे लोखंडी जॉब पाठीमागून येणाऱ्या गाड्यांवर पडल्यामुळे १० वाहनांचं मोठं नुकसान झाल्याचं कळतं आहे. या अपघातात सचिन ठाकरे या दुचाकीस्वाराला आपला जीव गमवावा लागला आहे. लोखंडी जॉब पडल्यामुळे या ठिकाणी पाठीमागून येणाऱ्या कार, टेम्पो आणि दुचाकींचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. दरम्यान या अपघाताचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नसलं, तरीही पोलिसांनी कंटेनरचे ब्रेक फेल झाल्यामुळे हा अपघात घडला असावा असा अंदाज व्यक्त केला आहे.

अपघात स्थळावर वाहतुकीची कोंडी पहायला मिळत होती