शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सायकलींचा वापर वाढवण्याची योजना पुण्यात आखण्यात आली होती. मंजुरीनंतर ती राबवण्यासाठी एका कंपनीला आदेशही देण्यात आला; पण पाच वर्षे होऊनही ही ‘सायकल वापरा’ योजना सुरू होऊ शकलेली नाही. मात्र आता तशी योजना सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे, कारण महापालिका अधिकाऱ्यांनी लंडन दौऱ्यात तेथील सार्वजनिक सायकल वापर योजना पाहिली असून तो प्रयोग पाहून ते प्रभावित झाले आहेत.
पुणे शहरातील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी आणि सायकल वापराला प्रोत्साहन देण्यासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक आबा बागूल यांनी सन २०१० मध्ये सायकल वापरा योजनेचा प्रस्ताव सर्वप्रथम दिला होता. महापालिकेने सुरुवातीला सुमारे पाचशे सायकली खरेदी कराव्यात आणि त्या भाडे तत्त्वावर मात्र अल्प भाडेदरात नागरिकांना चालवण्यासाठी उपलब्ध करून द्याव्यात अशी ही योजना होती. त्यासाठी शहरातील प्रमुख २५ ठिकाणी सायकल तळ उभारले जाणार होते. या तळावरून कोणत्याही नागरिकाने सायकल घ्यावी व ती वापरल्यानंतर पुन्हा त्याच सायकल तळावर किंवा त्याला शक्य असेल त्या तळावर ती परत करावी आणि या वापरापोटी त्याने भाडे द्यावे असे योजनेचे स्वरुप होते.
योजनेचा प्रस्ताव दिल्यानंतर योजनेवर बरीच चर्चा झाली आणि प्रत्यक्ष प्रस्ताव सन २०११ मध्ये तयार झाला. महापालिका प्रसासनाने हा सायकल योजनेचा प्रस्ताव तयार केल्यानंतर त्याची निविदा काढण्यात आली. ही निविदा काढल्यानंतर आलेल्या निविदेतील सर्वात कमी दराच्या निविदेला मंजुरी देणे अपेक्षित होते. मात्र त्या प्रक्रियेलाही महापालिकेला एक वर्ष लागले. निविदा मंजूर झाल्यानंतर ज्या कंपनीची निविदा मंजूर करण्यात आली होती त्या कंपनीला कार्यारंभ आदेशही (वर्क ऑर्डर) देण्यात आला. मात्र असा आदेश दिल्यानंतरही योजना सुरू झालीच नाही, अशी माहिती बागूल यांनी गुरुवारी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.
या योजनेबाबत तत्कालीन केंद्र सरकारनेही आस्था दाखवली होती. त्यामुळे प्रायोगिक तत्त्वावर ही योजना पुण्यात राबवण्यासाठी केंद्राने पुण्याला तीन कोटी रुपयांचे अनुदानही दिले होते. प्रत्यक्षात पुण्याने काहीच न केल्यामुळे ही प्रायोगिक तत्त्वावरील योजना सुरू होऊ शकली नाही.
स्मार्ट सिटीमधील काही योजनांसाठी पुणे महापालिका परदेशातील कंपन्यांचे सहकार्य घेणार असून त्या दृष्टीने आयुक्तांसह काही अधिकारी सध्या लंडनच्या दौऱ्यावर आहेत. ‘‘या दौऱ्यात आम्ही नुकतीच ‘ट्रान्सपोर्ट फॉर लंडन’ या विश्वातील एका मोठय़ा सार्वजनिक वाहतूक कंपनीला भेट दिली. लंडन शहरात एकात्मिक वाहतूक व्यवस्था देण्याचे काम ही कंपनी करते. या कंपनीतर्फे तेथे सायकल वापरा ही सार्वजनिक तत्त्वावरील योजना राबवली जात असून त्या योजनेच्या डेपोंना आणि कंट्रोलरूमला आम्ही भेट दिली. या योजनेत कंपनीमार्फत १२ हजार सायकली वापरण्यासाठी दिल्या जातात’’ असे आयुक्तांनी सांगितले. कंपनीच्या वतीने सुरू असलेल्या विविध उपक्रमांचे आयुक्तांनी कौतुक केले असून त्यामुळे सायकल वापरा योजना आता पुण्यातही सुरु होण्याच्या दृष्टीने प्रक्रिया होईल अशी शक्यता आहे.

पुण्यात २०११ मध्येच सायकल वापरा या योजनेला मंजुरी देण्यात आली होती. सुरुवातीचे दोन तास नि:शुल्क आणि नंतर प्रत्येक तासाला पाच रुपये असे शुल्कही निश्चित झाले होते. पहिल्या वर्षी तीनशे सायकली खरेदी केल्या जाणार होत्या. त्यापुढे देखील दरवर्षी सायकल खरेदी होणार होती. मात्र सर्व प्रक्रिया पूर्ण होऊनही योजना मात्र राबवली गेली नाही.
आबा बागूल, ज्येष्ठ नगरसेवक