प्राची आमले

शेतकरी बांधवांच्या कुटुंबीयांना त्यांच्या अडचणीच्या काळात मदतीचा हात देण्यासाठी व त्यांच्या मुलांना शिक्षणाच्या माध्यमातून चांगले भविष्य देण्याच्या हेतूने काम करणाऱ्या ‘निरंजन’ सेवाभावी संस्थेविषयी..

फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, ट्विटर हे आजच्या पिढीच्या जगण्यातले परवलीचे शब्द झाले आहेत. आज प्रत्येक व्यक्ती समाजमाध्यमांवर आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी समाजमाध्यम हे एक प्रभावी माध्यम आहे. हीच समाजमाध्यमांची ताकद ओळखून चांगली माहिती अनेकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सध्या ही माध्यमे प्रभावीपणे वापरून अनेक विधायक उपक्रम राबवले जात असल्याची उदाहरणे आपण आजपर्यंत पाहिली. आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून कोणत्याही नफ्याची अपेक्षा न ठेवता समाजातील वंचित व गरजूंसाठी विविध सामाजिक उपक्रम राबविण्याबरोबरच तळागाळातील घटकांपर्यंत पोहोचून त्यांच्या अडचणी दूर करण्याऱ्या ‘निरंजन’ सेवाभावी संस्थेविषयी माहिती घेणार आहोत.

‘ निरंजन’ सेवाभावी संस्थेची स्थापना २०१२ साली झाली. संस्थेतर्फे अनेक विधायक उपक्रम राबविले जातात. यामध्ये गरजू विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व, दुष्काळग्रस्त भागातील गाईंना आसरा मिळवून देण्यासाठी गोशाळा, अनाथ व दिव्यांग मुलांकरिता आंबे खाणे स्पर्धा, रक्षाबंधन, दांडिया, आरोग्य शिबिरे, गणेशोत्सवात पोलिसांकरिता मिनी हॉस्पिटल यांसारखे अनेक उपक्रम राबविण्यात येतात. संस्थेचे अध्यक्ष जयेश कासट म्हणाले, की सध्या ग्रामीण भागातील पाचशे मुलांचे शैक्षणिक पालकत्व संस्थेने घेतले आहे. समाजातील उपेक्षित आणि वंचित घटक हा कायमच दुर्लक्षित आहे. या समाजातील घटकांना सर्वप्रकारच्या सोयीसुविधा मिळाव्यात यासाठी संस्थेतर्फे अंध-अपंगांकरिता दांडिया, शारीरिकदृष्टया व्यंग असलेल्या व्यक्तींना मदत तसेच अनाथ मुलांच्या शैक्षणिक खर्चाची जबाबदारी संस्थेनेस्वीकारली आहे. संस्थेचे काम पाहता फक्त शहरातून नव्हे, तर देश- परदेशातून अनेक व्यक्तींनी मदतीचा हात पुढे केला आहे. संस्थेचे सर्व व्यवहार हे डिजिटल होत असून सर्व निधी हा संस्थेच्या कामासाठी वापरण्यात येतो. संस्थेमध्ये काम करणारे स्वयंसेवक  नि:स्वार्थपणे निरंतर सेवा करतात.

संस्थेच्या कामामध्ये समाजमाध्यमांची मोठी भूमिका असून सर्व उपक्रमांची माहिती ही समाजमाध्यमांद्वारे लोकांपर्यंत पोहोचली आहे.  संस्थेला मदत करणाऱ्या अनेक व्यक्ती या समाज माध्यमांद्वारे जोडल्या गेल्या असून थोडक्यात, संस्थेच्या प्रचार-प्रसार हा समाजमाध्यमांमुळे झाला आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुक लाइव्ह यांच्या मदतीने काही तासांतच गरजू व्यक्तींपर्यंत मदत पोहोचवली जाते. याविषयीचा अनुभव सांगताना कासट म्हणाले, की दुष्काळग्रस्त भागातील पाण्याची टंचाई पाहता फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून दुष्काळग्रस्तांसाठी पाण्याच्या  टँकरसाठी मदतीचे आवाहन केले, तर अवघ्या काही तासांतच संस्थेचे खात्यात मदत जमा झाली.  अशी अनेक उदाहरणे कासट यांच्याकडे आहेत. समाजमाध्यमांचा जर चांगल्या विधायक कामांसाठी उपयोग केला, तर ती समाजासाठी वरदान आहेत. संस्थेचे काम हे समाजमाध्यमांद्वारे लोकांपर्यंत पोहोचले असून विविध क्षेत्रांतील व्यक्ती जोडल्या गेल्या आहेत.

आगामी उपक्रमाविषयी माहिती देताना कासट म्हणाले, की सध्या पाचशे शेतकऱ्यांच्या मुलांचे शैक्षणिक पालकत्व संस्थेने घेतले आहे. परंतु केवळ एवढय़ाच मुलांपर्यंत मर्यादित न राहता शिक्षणाची ज्ञानगंगा अधिकाधिक मुलांपर्यंत पोहोचावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आगामी काळात एक हजार गरजू विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व संस्थेतर्फे घेण्यात येणार आहे.