हिटलरशाहीबाबतच्या माझ्या विधानाचा विपर्यास करण्यात आल्याचे माजी संमेलनाध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे यांनी रविवारी स्पष्ट केले.  ‘देशात हिटलरशाही आहे असं तुम्हाला वाटते का’, असा प्रश्न मला एका खासगी वृत्तवाहिनीने विचारला होता. तो प्रश्न फादर दिब्रिटो यांच्याशी संबंधित किंवा जोडलेला नव्हता. मात्र, याबाबत मी केलेल्या विधानाचा विपर्यास करण्यात आला. आमच्यात मतभिन्नता असू शकते, याची जाणीव मला आहे. मात्र, देशहिताची कळकळ आणि माणसांविषयीची तळमळ यांचा धागा आम्हाला स्वच्छपणे जोडणारा आहे, याची खात्री असल्याने फादर दिब्रिटो यांच्याशी संपर्क करणे मला आवश्यक वाटले, असे डॉ. अरुणा ढेरे म्हणाल्या.

फादर दिब्रिटो यांचे आजचे निवेदन त्यांची भूमिका स्पष्ट करणारेच आहे. मीही माझी प्रतिक्रिया पुरेशा स्पष्टपणे दिली होती. देशात हिटलरशाही नाही याचा अर्थ सर्वकाळी सुरळीत, सुखात आहे असा मुळीच नाही.

उलट समाज कधी नव्हे इतका अस्थिर आणि अशांत बनला आहे. अशा वेळी सुजाण आणि विचारी माणसांवरची जबाबदारी अधिकच वाढली आहे आणि मला वाटते, असे त्या म्हणाल्या.