‘आदिवासी जमातीच्या जीवनसंस्कृतीवरील छायाचित्रे पाहून आदिवासींच्या जीवनशैलीतील विविधतेची कल्पना येते. आदिवासी बांधव देशाची वनसंपदा जपण्याचे काम करीत आहेत. त्यांच्या जीवनशैलीचे दर्शन घडवणाऱ्या छायाचित्र प्रदर्शनामुळे पुणेकरांना आदिवासी संस्कृती पाहायला मिळणार आहे. आदिवासींचे नृत्य तसेच त्यांचे कलाकौशल्य जगासमोर यावे आणि त्यांना त्याचा योग्य मोबदला मिळावा, यासाठी आपण योगदान दिले पाहिजे,’ असे प्रतिपादन महापौर मुक्ता टिळक यांनी केले.

रिजनल अ‍ॅडव्हर्टायझिंग मार्केटिंग असोसिएशन (रामा) आणि बालमुद्रा डेव्हलपमेंट अ‍ॅन्ड रिसर्च सेंटर यांच्या वतीने, तसेच रसिकलाल एम. धारिवाल फाउंडेशन यांच्या सहभागाने छायाचित्रकार श्रीकृष्ण परांजपे यांनी काढलेल्या देशातील १६ राज्यांमधील १२५ आदिवासी जमातींच्या जीवनसंस्कृतीवरील छायाचित्रांचे आणि त्यांनी बनविलेल्या पर्यावरणपूरक वस्तूंचे प्रदर्शन शिवाजीनगर येथील राजा रविवर्मा आर्ट गॅलरी येथे आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी महापौर बोलत होत्या. जान्हवी धारिवाल, ‘रामा’चे अध्यक्ष दिनकर शिलेदार, मीना शिलेदार, छायाचित्रकार श्रीकृष्ण परांजपे, अपूर्वा परांजपे, विवेक वेलणकर, महेश घोरपडे, अंजन बर्वे यांची या प्रसंगी उपस्थिती होती.  आपल्या देशात विविध संस्कृती आहेत. त्यांचे जतन केले पाहिजे. कुशल कलाकारांना प्रोत्साहन मिळणे गरजेचे आहे. आदिवासी जीवनशैलीचे हे प्रदर्शन पाहून मी भारावून गेले. ही संस्कृती जोपासणे हे पुढच्या पिढीचे कर्तव्य आहे, असे मनोगत जान्हवी धारिवाल यांनी व्यक्त केले. या उपक्रमाची सविस्तर माहिती ‘रामा’चे अध्यक्ष शिलेदार यांनी दिली. यापुढेही अशाप्रकारचे उपक्रम राबविले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. हे प्रदर्शन मंगळवापर्यंत (१५ ऑगस्ट) सकाळी ११ ते सायंकाळी ७.३० या वेळेत खुले राहणार आहे.