स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पंतप्रधान पिक विमा योजनेच्या कार्यशाळेत चांगलाच गोंधळ घातला. या कार्यक्रमात कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत बोलत असताना पीक विमा योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत कार्यकर्त्यांनी सदाभाऊंना जाब विचारला शिवाय घोषणाबाजी देखील केली.

यावेळी काही कार्यकर्ते उठून सदाभाऊंच्या दिशेनेही धावत गेले.काही केलं ना आक्रमक कार्यकर्ते शांत होताना दिसत नव्हते. त्यामुळे शेवटी पोलीस कार्यशाळेत दाखल झाले. घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घातलेल्या या गोंधळामुळे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे देखील चांगलेच संतापले होते. कार्यकर्त्यांच्या प्रश्नांना प्रत्युत्तर देतांना मी पण चळवळीतून आलो आहे. घोषणा देणाऱ्यांना शेतकऱ्यांशी काही देणंघेणं नाही. प्रसिद्धी मिळवण्याची त्यांच्या डोक्यात हवा शिरली आहे. घोषणा काय देता तुमच्यात हिंमत असेल तर मैदानात या, तारीख सांगा मैदान सांगा मी तिथे एकटा यायला तयार आहे, असे ते म्हणाले.

तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना उद्देशुन सदाभाऊ यांनी म्हटले की, तुमची जागा हातकणंगले मतदारसंघात दाखवून दिली आहे. तुम्ही शेतकऱ्यांच्या विरोधात आहे हे जनतेन दाखवून दिल आहे. तुमची ही मस्ती चालू देणार नाही. त्यामुळे आगामी काळात पुन्हा एकादा राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्यातील वाद चिघळण्याची चिन्ह दिसत आहेत.