अंदमान येथे होणाऱ्या चौथ्या विश्व साहित्य संमेलनाची स्मरणिकाही स्वातंत्र्यवीर सावरकर यांनाच समर्पित करण्यात आली आहे. ‘अक्षरयात्रा’ या विशेषांकात सावरकरांच्या साहित्यविश्वाचा आणि विचारविश्वाचा परामर्श घेण्यात आला आहे.कवी, नाटककार, निबंधकार, कथा-कादंबरीकार, विचारवंत, समाजकारणी, राजकारणी असे सावरकरांचे विविध पैलू ‘अक्षरयात्रा’तून उलगडण्यात आले आहेत. या अंकाचे संपादन मनोहर सोनवणे आणि महेंद्र मुंजाळ यांनी केले असून प्रा. सुजाता शेणई आणि डॉ. मेधा सिधये यांनी संपादन सहकार्य केले असल्याची माहिती साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांनी दिली. सावरकरांच्या वाङ्मयीन चरित्रावर डॉ. प्र. ल. गावडे यांनी प्रकाश टाकला आहे. सावरकरांच्या साहित्याचा, या साहित्यातील स्त्रीविश्वाचा, भाषाशुद्धी आणि लिपीशुद्धीविषयक चळवळीसंदर्भात डॉ. संजय पोहरकर, डॉ. विद्याधर करंदीकर, डॉ. यशवंत पाठक, विनया खडपेकर, डॉ. नीलिमा गुंडी आणि मुकुंद गोखले यांच्या लेखांचा समावेश आहे.अक्षरयात्राच्या दुसऱ्या भागात सावरकरांच्या समाजसुधारणेचा हेतू, सामाजिक विचार, इतिहास मीमांसा, विज्ञाननिष्ठा, बुद्धिवाद, आध्यात्मिकता या पैलूंवर प्रा. शेषराव मोरे, प्रा. अनिरुद्ध देशपांडे, डॉ. मुकुंद दातार, डॉ. शं. ना. नवलगुंदकर, प्रवीण दवणे, अविनाश धर्माधिकारी, डॉ. शुभांगी कोंडोलीकर आणि डॉ. भालचंद्र शिंदे यांनी प्रकाश टाकला आहे. या संमेलनाचे अध्यक्ष प्रा. शेषराव मोरे यांच्या संशोधकीय वाटचालीवर दृष्टिक्षेप टाकणारा प्रा. संतोष शेलार यांचा लेख, ‘अनादी मी! अनंत मी!’ हा सावरकर साहित्यावर नाटय़प्रयोग साकारणारे माधव खाडिलकर, अंदमानच्या सेल्यूलर जेलच्या अधिकारी डॉ. रशिदा इक्बाल यांच्या लेखांचा समावेश आहे.