पूर्वीच्या संगीतामध्ये गीतातील शब्दांना आणि काव्याला महत्त्व होते. ते बदलून आता ताल आणि ठेका महत्त्वाचा झाला. आमच्याच घरातील पुढच्या पिढीने केलेल्या ‘त्रिदेव’ चित्रपटातील ‘ओए ओये’ हे गीत गाजले. चित्रपट संगीतामध्ये झालेला हा बदल ओळखून कल्याणजीभाई यांनी आता आपण थांबले पाहिजे, हे सांगितले. मीदेखील त्यांच्या मताशी सहमत झालो. काव्याची जागा ठेक्याने घेतली अन् आम्ही संगीत देण्याचे थांबविले.. कल्याणजी-आनंदजी या लोकप्रिय संगीतकार जोडीतील आनंदजी शहा यांनी गुरुवारी ही भावना व्यक्त केली. आम्ही संगीत देण्याचे थांबविण्याचा निर्णय घेतला याचे दु:ख वाटत नाही, असेही त्यांनी सांगितले.
‘चंदन सा बदन’, ‘गोिवदा आला रे आला’, ‘ओ बाबूल प्यारे’, ‘ये समा समा है ये प्यारका’, ‘रुठे रुठे पिया मनाऊ कैसे’, ‘छोड दे सारी दुनिया किसी के लिये’, ‘मेरा जीवन कोरा कागज कोराही रह गया’, खई के पान बनारसवाला’, क्या खूब लगती हो बडी सुंदर दिखती हो’, ‘परदेसियोंसे ना अखिया मिलाना’ या गीतांपासून ते ‘सात सहेलिया खडी खडी’ अशा अनेक गीतांना स्वरसाज देणाऱ्या कल्याणजी-आनंदजी यांना पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गुरुवारी एस. डी. बर्मन पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यानिमित्ताने अवघ्या ८२ वर्षांच्या आनंदजी यांनी पत्रकारांशी संवाद साधताना जणू सारे प्रसंग कालच घडले असावेत अशा पद्धतीने जुन्या स्मृतींना उजाळा दिला.
आम्ही गुजरातमधील व्यापारी; तुमच्या भाषेत बनिया. मुंबईला गिरगावातील मराठमोळ्या वातावरणात लहानाचे मोठे झालो. तो संस्कार आमच्या संगीतावर आहे. खरे तर मला नायक व्हायचे होते. पण, हिरोला उंची लागते. माझी उंची काही केल्या वाढेचना. मग, कल्याणजीभाईच्या साथीने संगीतकार झालो. शिक्षण फारसे झालेले नसल्याने कधी कॉलेजात गेलो नाही. पण, हेमंतदा (हेमंतकुमार),तलतदा (तलत मेहमूद) आणि गीता दत्त यांना घेऊन कॉलेजमध्ये कार्यक्रम केले. शंकर-जयकिशन हे राज कपूर यांचे आवडते संगीतकार. पण, ‘छलिया’ करताना त्यांनी आम्हाला संधी दिली. तेव्हापासून कल्याणजी-आनंदजी हे आमचे नाव जोडले गेले. आम्ही भाऊ असल्याने कधी ‘इगो’चा प्रश्न आला नाही. कल्याणजीभाई सूरज आहेत, तर मी चाँद आहे याची मला जाणीव आहे, अशा शब्दांत आनंदजी यांनी आपली ओळख करून दिली.
‘नागीन’ चित्रपटातील ‘बीन’ची आठवण त्यांनी सांगितली. नागावरचा चित्रपट असल्याने हेमंतकुमार यांनी बीन वाजविण्यासाठी निमंत्रित केले. बीन म्हणजे गारुडय़ाची पुंगी त्यांना हवी होती. बीन म्हणजे वीणा असे आम्हाला वाटले. त्यामुळे वीणावादनातून बीनचे स्वर येणार नाहीत असे त्यांना सांगितले. मग, क्ले-व्हायोलिनवर केलेली ही धून अजरामर झाली, असे आनंदजी यांनी सांगितले. ब्रीच कँडी रुग्णालयात आजारी असलेल्या मित्राचे निधन झाले. त्या वेळी मला ‘ओ साथी रे तेरेबिना भी क्या जीना’ या गीताचा मुखडा सुचला. तर, एकदा साडी नेसल्यावर पत्नीने कशी दिसते असे विचारले तेव्हा पटकन मी ‘क्या खूब लगती हो बडी सुंदर दिखती हो’ असे बोलून गेलो आणि हे गीत लोकप्रिय झाले. लता मंगेशकर यांची सर्वाधिक सोलो गाणी कल्याणजी-आनंदजी यांच्याकडेच आहेत याचा अभिमान असल्याचे सांगून आनंदजी यांनी लतादीदींसह, महमंद रफी, किशोरकुमार, मुकेश यांच्या गायनाची वैशिष्टय़े उलगडली.
………………….