मतदान केंद्रस्तरीय स्वयंसेवक घोषित; जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी बैठक

पुणे : निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्ह्य़ात मतदार यादी पुनर्परीक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. या कार्यक्रमांतर्गत मतदार नोंदणी, नावातील दुरुस्ती आणि नावे वगळणे ही कामे करण्यात येत आहेत. या कामासाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील सहकारी गृहनिर्माण संस्थांचे अध्यक्ष, सचिव यांना मतदान केंद्रस्तरीय स्वयंसेवक म्हणून घोषित करण्यात आले आहे.

या घोषणेच्या पाश्र्वभूमीवर पुणे, पिंपरी-चिंचवडमधील गृहनिर्माण संस्थांचे अध्यक्ष आणि सचिव यांची शुक्रवारी (१९ ऑक्टोबर) बैठक आयोजित करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी बारा वाजता ही बैठक होणार आहे.

जिल्हा प्रशासनाच्या निवडणूक शाखेकडून अधिकाधिक मतदार नोंदणीसाठी ऑक्टोबर महिन्यातील प्रत्येक रविवारी सर्व मतदान केंद्रे आणि प्रत्येक मंगळवारी शहरासह जिल्ह्य़ातील सर्व महाविद्यालयांमध्ये विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.

निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मतदार याद्यांच्या पुनर्परीक्षण कामासाठी सहकारी गृहनिर्माण संस्थांची मदत घेतली जाणार आहे.

त्यानुसार संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना निवडणूक विषयक कामकाजात सहभागी करून घेतले जाणार आहे. मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी सोसायटय़ांमधील नवीन मतदारांची नावनोंदणी करणे, दुबार व मयत आणि स्थलांतरितांची नावे कमी करणे, मतदार यादीतील सध्याची नावे, पत्ते व छायाचित्रांमधील दुरुस्ती करणे याची जबाबदारी पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या अध्यक्ष व सचिवांकडे देण्यात आली आहे.

उप जिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंह यांनी मंगळवारी ही माहिती  दिली.