हजारोंची गर्दी, कोटय़वधींच्या उधळपट्टीला लगाम

पिंपरी : हजारोंची गर्दी, मानापमानाची चढाओढ, घोडे, हत्ती, उंटांचा समावेश असणाऱ्या भव्य मिरवणुका, फटाक्यांची आतषबाजी, बेफाम होऊन नाचणारी तरुणाई असे सर्रास दृश्य आतापर्यंत पिंपरी-चिंचवडसह खेड-मावळ भागातील विवाह सोहळ्यांमधून दिसत होते. करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत आता लग्नसराईचा संपूर्ण थाटच बदलू लागला आहे. कोटय़वधींच्या उधळपट्टीसह आतापर्यंत चालत आलेल्या  सर्वच अतिरेकी प्रकारांना लगाम बसतो आहे.

विवाह सोहळ्यांच्या माध्यमातून संपत्तीचे ओंगळवाणे प्रदर्शन करण्याची चढाओढ ही शहर तसेच पंचक्रोशीतील विवाह सोहळ्यांची खासियत मानली जाते. तालेवार घराणे असो,की ज्यांची ऐपत नाही अशा कुटुंबांनाही लग्नसोहळा धडाक्यात करण्याची हौस असल्याचे दिसून येते. दोन्हीही परिवार तसेच त्यांच्या निकटवर्तीयांकडून पैशांची वारेमाप उधळपट्टी होणे ही बाब प्रतिष्ठेची मानली जाते. महागडी मंगल कार्यालये, पाहुण्यारावळ्यांचे मानापमान, उपस्थित मान्यवरांचे (विशेषत: राजकारण्यांचे) सत्कार समारंभ, स्वागतपर तथा आशीर्वादपर मनोगत अशा गोंडस नावाखाली होणारी भाषणबाजी, जेवणावळी, मिरवणुका, फटाक्यांचा धूर अशा अनेक माध्यमातून खर्चाचा अतिरेक होणे नित्याचीच बाब होती. कुणी निंदा, कुणी वंदा याचे काहीही सोयरसुतक न बाळगता सर्रास हे सोहळे पार पडत होते. करोनामुळे हे चित्र बदलले आहे. आता जेमतेम ५० जणांच्या उपस्थितीसह अनेक अटी घालण्यात येत असल्याने हौसेला मुरड घालण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. लग्नपत्रिका वाटताना होणारी दमछाक टळली असून खर्चिक प्रकारांना आपसुक आळा बसू लागला आहे. मंडपातील सजावटी मर्यादित झाल्या असून धार्मिक विधी आटोपशीर होऊ लागले आहेत. गर्दीतील मान्यवरांचे स्वागत करणाऱ्या सूत्रसंचालकाचा ताण कमी झाला. अल्प उपस्थितीमुळे  विवाह सोहळ्यांमध्ये दिसून येणारी गडबड, जेवणावळीत होणारा गोंधळ कमी झाला. वराती जवळपास बंद पडल्या आहेत. फटाक्यांमुळे होणारे प्रदूषण टळताना दिसते आहे. असे असतानाही काही जणांकडून शासन नियम न पाळता जोरात लग्न करण्याचे प्रयत्न झाले. मात्र, संबंधितांना पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागले.

विवाह सोहळ्यात साधेपणा येऊ लागला आहे. दोन्ही परिवारांच्या खर्चात बचत होते आहे. फटाके, मिरवणुका, सजावटीचा नाहक  खर्च आता टळू शकेल. करोनाचे संकट मोठे असल्याने ते समजून घेत काही बदल स्वीकारावेच लागतील.

– कैलास आहेर, संचालक, आहेर गार्डन, चिंचवड

साधेपणाने होऊ लागलेले विवाह सोहळे, हा बदल आश्वासक आहे. गर्दी कमी असल्याने शांततेत विवाह सोहळे पार पडू लागले आहेत. मान्यवरांच्या सत्काराची मोठी यादी आपसुक कमी झाली आहे. इतर खर्चातही बचत होत आहे.     – संदीप साकोरे, निवेदक