28 February 2021

News Flash

करोनाचा फटका : लोणावळ्यातील पर्यटनस्थळे ओस; व्यावसायिक आर्थिक संकटात

अनेकांसमोर कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न

करोना महामारीचा परिणाम सर्वच ठिकाणी व सर्वच क्षेत्रात जाणवत आहे. पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या लोणावळ्यात देखील याचा परिणाम जाणवत आहे. करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर घालण्यात आलेल्या नियमांमुळे सध्या लोणावळामधील पर्यटनस्थळं ओस पडल्याचे दिसत आहेत. तर, यामुळे येथील स्थानिक व्यावसायिकांना मोठा फटका बसला असून, अनेकांसमोर कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

लोणावळ्यात येणाऱ्या पर्यटकांवर अनेक स्थानिक नागरिकांसह व्यावसायिकांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून आहे.  यामुळे दरवर्षी छोटे हॉटेल्स व्यवसायिक, स्टॉलधारक लोणावळ्यातील पर्यटनस्थळं फुलून जाण्याची वाट पाहत असतात. परंतु, यावर्षी करोना प्रादुर्भावामुळे येथील शेकडो कुटुंबांच्या उदरनिर्वाहचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दरवर्षी भुशी धरण, टायगर पॉईंट, सहारा ब्रिज, तुंगारली धरण आदी परिसरात वर्षा विहाराचा आनंद घेण्यासाठी पर्यटक हजारोच्या संख्येने आवर्जून लोणावळ्यात येतात.

परंतु, यावर्षी जिल्ह्याधिकाऱ्यांनी पर्यटकांना बंदी घातल्याने येथील छोट्या हॉटेल्स आणि स्टॉलधारक व्यवसायकांची आर्थिक गणितं बिघडली आहेत. दरवर्षी जून महिन्याच्या शेवटी भुशी धरण काटोकाट भरताच पायऱ्यांवरून ओसंडून पाणी वाहते. धरण भरल्याची माहिती सोशील मीडियावरून अवघ्या महाराष्ट्रभर काही क्षणात पसरते आणि पर्यटकांची पावलं लोणावळ्याकडे वळतात. मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवडसह परराज्यातून शेकडो पर्यटक लोणावळ्यातील भुशी धरण पाहण्यास उत्सुक असतात. पर्यटकांमुळे स्थानिक स्टॉलधारक, छोटे हॉटेल्स, मक्याचे कणीस विकणारे, फोटोग्राफर यांचा व्यवसाय जोमात चालायचा. मात्र, यंदा या सर्वांना करोनाचा फटका बसल्याचे दिसत आहे.

भुशी धरणाच्या पायऱ्यांवरून वाहणारे पाणी, धुक्यात हरवलेले भुशी धरण हे पाहण्यास पर्यटक नाहीत. सर्व पर्यटनस्थळे ओस पडली आहेत. याचा थेट फटका येथील स्थानिक छोट्या व्यवसायिकांना बसला आहे. भुशी धरण भरल्यानंतर 4 महिने येथील व्यवसायिकांचा व्यवसाय जोमात चालायचा. वर्षभराची कमाई ते अवघ्या 4 महिन्यात करायचे. मात्र, यावर्षी उलट चित्र असून कुटुंबाचा उदरनिर्वाह भगवायचा कसा? असा प्रश्न भुशी धरण परिसरातील छोट्या व्यवसायिकांना पडला आहे. अत्यंत वाईट परिस्थिती आल्याचे ते सांगतात.

भुशी धरण परिसरात फोटोग्राफी करणारा यश फाटे म्हणाला, दरवर्षी आमचा फोटोग्राफीचा व्यवसाय चांगला व्हायचा. पण, यावर्षी करोनामुळे पर्यटकांना बंदी असल्याने आर्थिक नुकसान झाले आहे. व्यवसाय ठप्प झाला आहे, आमचे हाल  सुरू आहेत. भुशी धरण भरल्यापासून 4 महिने पर्यटक या ठिकाणी येत असतं, हजारो जण आल्यामुळे भुशी धरण पर्यटकांनी गजबजून जायचे. अवघ्या वर्षाची कमाई या चार महिन्यात होत असे. त्याच्यावर आमचे कुटुंब चालत असल्याचेही तो म्हणाला.

स्नॅक्स सेंटर, हॉटेस चालक दिनेश कुऱ्हाडे म्हणाले, राम नगर आणि भुशी धरण परिसरातील स्थानिक हे भुशी धरणावर दरवर्षी येणाऱ्या पर्यटकांवर अवलंबून होते. पण, कोरोनामुळे पर्यटकांना बंदी असल्याने आमचे नुकसान झाले आहे. व्यवसाय ठप्प झाले आहेत, येथील नागरिकांची उपजीविका भुशी धरणावर होते. हॉटेल्स, छोटे स्टॉल्स, इतर व्यवसायिक हे पर्यटकांवर अवलंबून होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 13, 2020 1:15 pm

Web Title: corona effect lonavala tourist spots empty local business in financial crisis msr 87 kjp 91
Next Stories
1 पुण्यात नागरिकांची मार्केट यार्डमध्ये खरेदीसाठी झुंबड; भाजीपाला महागला
2 पुण्यात तरुणाचा गोळ्या घालून खून
3 पुणेकर इंजिनिअरला १.९२ लाखांचा गंडा, युरोपात नोकरीचं आमिष दाखवून फसवणूक
Just Now!
X