करोना विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर रुग्णालयातील उपचारानंतर पूर्णपणे बरे झालेल्या चिंचवड येथील दाम्पत्याचे गुरुवारी परिसरातील नागरिकांनी जोरदार स्वागत केले. परिसरात रांगोळ्या काढण्यात आल्या. ढोल-ताशांची मिरवणूक काढून त्यांच्यावर फुलांचा वर्षांव करण्यात आला. हे वातावरण पाहून दाम्पत्य भारावून गेले.

पुण्यात परिचारिकेचे काम करणाऱ्या या महिलेला काही दिवसांपूर्वी करोनाची लागण झाली. त्यानंतर, तिच्या पतीलाही संसर्ग झाला. त्यांच्यावर पुण्यात ससून रुग्णालयात उपचार करण्यात आले. १४ दिवसांचे उपचार व त्यानंतरच्या चाचणीत त्यांचे निगेटिव्ह अहवाल आल्यामुळे गुरुवारी त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले. चिंचवडला घरी परतल्यानंतर त्यांची ढोल, ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. रस्त्यावर रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. एकसुरात टाळ्या वाजवतानाच त्यांच्यावर फुलांचा वर्षांव करण्यात आला. महिलांनी त्यांचे औक्षण केले. हे वातावरण पाहून दोघेही भारावून गेले. पुन्हा कामावर रूजू होण्याची इच्छा परिचारिका महिलेने या वेळी बोलून दाखवली.