आयुक्तालये, मुख्यालयात कक्ष कार्यान्वित

पुणे :  राज्यातील एक हजारांपेक्षा जास्त पोलीस कर्मचाऱ्यांना करोनाची बाधा झाली आहे. अशा परिस्थितीत पोलीस तसेच त्यांच्या कुटुंबीयांना तत्काळ मदत उपलब्ध करून देण्यासाठी पोलीस दलाने पाऊले उचललेली आहेत. राज्यातील सर्व पोलीस आयुक्तालये तसेच ग्रामीण पोलीस मुख्यालयात करोना मदत कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे.

राज्यातील सर्व पोलीस आयुक्तालये, जिल्हा पोलीस मुख्यालये, लोहमार्ग पोलीस मुख्यालये अशा एकूण मिळून ४८ ठिकाणी ६३ पेक्षा जास्त पोलीस आधिकाऱ्यांची समन्वय अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली. राज्यातील वेगवेगळ्या भागात बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांना करोनाची बाधा होणे, त्याच्या संपर्कात आलेल्या पोलिसांचे विलगीकरण केल्याबाबतची माहिती दैनंदिन अहवाल स्वरुपात दररोज मुंबईतील पोलीस महासंचालक कार्यालयात पाठविण्यात येत आहे.

सेवा बजावताना पोलीस, आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी, वैद्यकीय तज्ज्ञ थेट करोनाबाधितांच्या संपर्कात येत आहेत.अशा परिस्थितीत पोलिसांना करोनाच्या संसर्गाला अटकाव घालण्याबाबत आवश्यक ती साधने पुरविण्यात येत आहेत. मुखपट्टी, जंतुनाशके, घरी पोहचल्यानंतर  घ्यावयाची काळजी, कुटुंबीयांची घ्यावयाची काळजी याबाबत काही मार्गदर्शक सूचना करण्यात आल्या आहेत. पुणे पोलीस दलात अशा करोना मदत कक्ष  कार्यान्वित करण्यात आला असून शिवाजीनगर पोलीस  मुख्यालयाचे पोलीस उपायुक्त वीरेंद्र मिश्र समन्वय अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त मिलिंद पाटील,  पोलीस निरीक्षक भास्कर जाधव या कक्षाचे काम पाहत आहेत. पुणे पोलीस दलातील २२ पोलीस करोनाबाधित झाले होते. त्यापैकी दहा जणांना उपचारानंतर सोडून देण्यात आले आहे. करोनाबाधित सहायक फौजदाराचा काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता.

बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाकडून करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात शहरातील बहुतांश पोलिसांना करोना संसर्गाला अटकाव कसा घालावा, काय काळजी घ्यावी याची माहिती असल्याचे समोर आले. करोनाबाधित पोलिस तसेच त्यांच्या कुटुंबीयांना तातडीने वैद्यकीय मदत  उपलब्ध करून देण्यासाठी  कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे.

– डॉ. के.वेंकटेशम,पोलीस आयुक्त, पुणे