जगभरात करोना व्हायरस आजारानं थैमान घातले आहे. त्या पार्श्वभूमीवर आम्ही सर्व जण मागील तीन दिवसांपासून घरात आहोत. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत जनता कर्फ्यू सहभागी झालो. त्यामुळे दिवसभर कामानिमित्त घराबाहेर असलेले सर्व जण एकत्र पाहून आनंद होतोय. ज्या प्रकारे आज एकत्र आलो आहोत. त्याच ताकदीने करोना व्हायरस देशातून हद्दपार करू या, अशी भावना पुण्यातील मधुरा गांधी यांनी व्यक्त केली.

करोनानं जगालाच वेठीस धरलं आहे. करोनाचा संसर्ग प्रचंड वेगानं वाढत चालला आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रत्येक देशाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. देशात मागील दोन आठवड्यात करोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून आले आहेत. तर काही जणांचा मृत्यूही झाला आहे. रविवारी जनता कर्फ्यू पाळण्यात आल्यानंतर महाराष्ट्रात जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. त्यानिमित्ताने पुण्यातील दत्तात्रय गांधी परिवारासोबत लोकसत्ता डॉट कॉमच्या प्रतिनिधीनं संवाद साधला.

मयूर गांधी म्हणाले, ‘करोना आजाराच्या पार्श्वभूमीवर रविवारी जनता कर्फ्यू पुकारण्यात आला होता. त्यामध्ये आम्ही सहभागी झालो. त्यामुळे कुटुंबाला वेळ देणं शक्य झालं. माझा दोन वर्षाच्या मुलासोबत दिवस घालवला. घरी असतानाही आम्ही सर्व जण आरोग्याची काळजी घेत आहोत.’

दत्तात्रय गांधी म्हणाले, ‘आमचं सहा जणांचं कुटुंब असून मी, पत्नी, मुलगा, मुलगी, सून आणि नातू असा परिवार आहे. कुटुंबाला सततच्या कामामुळे वेळ देणं शक्य होत नाही. पण करोना आजारामुळे तीन दिवसांपासून घरी आहोत. नातवासोबत वेळ घालवतोय. एकत्रित बसून अनेक विषयावर गप्पा होत आहे. या काळात सर्वानी आपल्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी,’ असं आवाहन त्यांनी केलं.

स्वाईन फ्लूप्रमाणं करोनाला परतवून लावू : ज्योती गांधी

पुणे शहरात बारा वर्षांपूर्वी स्वाइन फ्लू आजार आला होता. तेव्हा देखील प्रत्येक व्यक्तीच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. तेव्हा आपण सर्वानी काळजी घेऊन, तो आजार नियंत्रणात आणला. त्याप्रमाणे हा आजार आपण परतून लावणार आहोत. मात्र सध्याची परिस्थिती लक्षात घेता, आम्ही प्रत्येक जण आरोग्याची काळजी घेत आहोत.