-सागर कासार

धुलिवंदनाच्या आनंदात न्हाऊन निघालेलं पुण्याला त्या जबर धक्का बसला. जगभरात थैमानं घालणाऱ्या करोनाचे दोन रुग्ण पुण्यात सापडल्याचं वृत्त झळकलं. त्यानंतर पुण्यातील नागरिकांची झोपचं उडाली. पण, एका महिन्यानंतर पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्रातील हे पहिलं करोना बाधित दाम्पत्य बरं झालं असून त्यांना लवकरच सुटी दिली जाणार आहे. त्या दोघांचा १४ दिवसाचा उपचाराचा कालावधी पूर्ण झाला आहे. त्यातील पहिली तपासणी निगेटिव्ह आली असून, अद्याप एका टेस्टचा रिपोर्ट बाकी आहे. लोकांच्या मनात करोनानं भीतीचं घर तयार केलेलं असताना लोकसत्ता ऑनलाईननं करोनावर मात केलेल्या दाम्पत्याशी संवाद साधला. ‘आम्हाला करोना झाल्याचं समजताच घाबरलो होतो. पण त्यानंतर आमच्या तब्येतीमध्ये सुधारणा होत गेली. मात्र १४ दिवसांचा कालावधी आमच्यासाठी कठीण होता,’ अशी भावना त्यांनी व्यक्त केली. तसेच नागरिकांनी घाबरून जाऊ नये, करोनापासून बचाव करण्यासाठी घरात रहावं, असं आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.

करोनाशी लढा देणारी महिला रुग्ण म्हणाली, ‘करोना या आजारानं जगभरात थैमान घातले होते. त्याबाबतची माहिती आम्हाला होती. त्याच दरम्यान आम्ही दुबईवरून आलो आणि त्यानंतर आमची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये आम्ही बाधित असल्याचे समजले. हे ऐकून घाबरलो. आता आपल कसं होणार, यावर कोणत्याही प्रकारची लस देखील उपलब्ध नाही. या विचारात आम्ही होतो. डॉक्टरांनी तर आम्हाला स्वतंत्र खोलीत ठेवले. आयुष्यात पहिल्यांदाच अशा एकांतात आणि एका आजाराच्या विरोधात आपल्याला लढा द्यावा लागणार. या विचारात होते. तेव्हा या आजाराबाबत यू-ट्यूबच्या माध्यमातून माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पण काहीच उपचार नसल्याचे समोर कळत होतं. तेव्हा खचून न जाता सकारात्मक राहायला पाहिजे. हेच मनात आणले आणि तेथून ठरवले की, काही झाले तरी आपण ठणठणीत होऊन येथून बाहेर पडायचं. त्यानंतर नाश्ता, जेवण आणि गोळ्या वेळेवर घेत राहिले. तब्येतीत सुधारणा हळूहळू झाल्यावर, पाच दिवसानंतर दुसर्‍या ठिकाणी शिफ्ट करण्यात आले. तेव्हा माझ्याबरोबरच अनेक रुग्ण तिथे होते.’

डॉक्टर, नर्ससह सर्वांच्या ऋणात राहू

‘आम्ही राज्यातील पहिले रुग्ण होतो. त्यामुळे वेगळ्याच विचारात होतो. मात्र त्यावेळी डॉक्टर, नर्स यांच्यासह सर्व यंत्रणेने जो काही कायम विविध माध्यमातून संवाद साधला. त्या बद्दल कायम ऋणी राहिल. आज आमची पुन्हा टेस्ट करण्यात आली आहे. त्याचा रिपोर्ट लवकर येईल आणि केव्हा घरी जातेय असं मला झाले आहे. पण मी जरी घरी गेले. तरी डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच घराबाहेर पडणार आहे. रुग्णालयातील सर्व रुग्णांची तब्येत ठणठणीत असल्याचीह माहिती त्यांनी दिली.

या १४ दिवसांविषयी लिहिणार

‘आज जगभरात करोना आजाराचा उद्रेक झालेला आहे. देशातही तशीच स्थिती असून तरी देखील आपल्या येथे नागरिक रस्त्यावर फिरत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती आम्हाला कळतं आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी किमान काही दिवस तरी घरी बसून, हा आजार परतवून लावावा,’ असं आवाहन करण्याबरोबरच ‘माझ्यासाठी हा काळ खूप कठीण होता आणि या १४ दिवसातील अनुभवांबद्दल लिखाण करत आहे,’ असंही त्यांनी सांगितलं.