भारतभर थैमान घातलेल्या करोना विषाणू संसर्गाच्या तावडीतून भारतीय सैन्यदलांच्या जवान आणि अधिकाऱ्यांचीही सुटका झालेली नाही. मागील सहा महिन्यांमध्ये तिन्ही सैन्यदलांतील तब्बल १९,८३९ जवान आणि अधिकाऱ्यांना करोना विषाणू संसर्ग झाला आहे. त्यांपैकी सर्वाधिक रुग्ण हे भारतीय भूदलात असल्याचे दिसून आले आहे. देशाचे संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी सध्या सुरू असलेल्या संसद अधिवेशनादरम्यान ही माहिती दिली. सैन्यदलांमध्ये १९,८३९ जवान आणि अधिकाऱ्यांना करोना संसर्ग झाला आहे. त्यांपैकी सर्वाधिक १६,७५८ रुग्ण भूदलातील आहेत. त्यापाठोपाठ १३६५ रुग्ण हवाई दलात तर १७१६ रुग्ण नौदलातील आहेत. भूदलातील ३२ तर हवाई दलातील तीन जवान आणि अधिकाऱ्यांचा करोनाने मृत्यू झाला आहे. सुदैवाने नौदलातील कोणीही करोनाने दगावले नसल्याची माहिती नाईक यांच्याकडून देण्यात आली आहे. केंद्र शासनाच्या संरक्षण मंत्रालयामार्फत याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे.