रात्री-अपरात्री फटाके आणि गोंधळ

पुणे : करोनाच्या संसर्गात लागू करण्यात आलेले  निर्बंध शिथिल झाल्यानंतर चौकाचौकात पुन्हा कथित भाई आणि भाऊंचे वाढदिवस सार्वजनिक स्वरूपात साजरे करण्यास सुरुवात झाली आहेत. रात्री अपरात्री फोडण्यात येणारे फटाके आणि गोंधळामुळे सामान्यांना, विशेषत: ज्येष्ठ नागरिकांना त्रास होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात आल्या आहेत.

शहरात संचारबंदी तसेच जमावबंदीचे आदेश लागू असताना रात्री रस्त्यावर शुकशुकाट असायचा. निर्बंध शिथिल झाल्यानंतर शहरात रात्री अपरात्री वाढदिवस साजरे करण्याचे प्रकार पुन्हा  वाढीस लागले आहेत. रात्री बाराच्या ठोक्याला रस्त्याच्या मध्यभागी टोळक्यांकडून केक कापण्यात येत असून आरडाओरडा करण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. मध्यभागाच्या तुलनेत उपनगरांत गुन्हेगारी वाढत आहे. परिसरात वर्चस्व निर्माण करण्यासाठी कथित भाई आणि भाऊंचे वाढदिवस सार्वजनिक स्वरूपात साजरे करण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. अशा वाढदिवसांमुळे सामान्यांना विशेषत: ज्येष्ठ नागरिकांना त्रास होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात आल्या आहेत.

शहरात किरकोळ वादातून टोळक्यांकडून दहशतीचे प्रकारही वाढीस लागले आहेत. सामान्यांच्या वाहनांच्या तोडफोडीचे प्रकार उपनगरात घडले आहेत. वाढदिवस  साजरा करणाऱ्या टोळक्यांना गस्त घालणाऱ्या पोलिसांकडून केवळ समज देण्यात येते. त्यांच्याविरोधात कारवाई अथवा गुन्हे दाखल केल्यास रस्त्यावर साजऱ्या होणाऱ्या वाढदिवसांना किमान आळा बसेल, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे. मध्यंतरी तलवारीने केक कापण्याच्या घटना पुणे तसेच पिंपरी शहर परिसरात घडल्या होत्या. अशा प्रकारच्या ध्वनिचित्रफिती समाजमाध्यमावरून प्रसारित करण्यात आल्या होत्या. ध्वनिचित्रफीत प्रसारित झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली होती.

तळजाई टेकडीवर वाढदिवस

तळजाई टेकडीवर दररोज रात्री वाढदिवस साजरा करण्यासाठी उपनगरातील काही जण मोठ्या संख्येने जमत असल्याच्या तक्रारी या भागातील नागरिकांनी केल्या आहेत. दररोज रात्री या भागात टोळक्यांकडून उच्छाद मांडला जातो. जोराने हॉर्न वाजवणे, भरधाव वाहन चालविण्याचे प्रकार या भागात घडतात. दररोज सकाळी आणि सायंकाळी तळजाई टेकडीवर नागरिक फिरायला येतात. वाढदिवस साजरा करण्यासाठी कापलेले केक रस्त्यावरच टाकण्यात येतात. दारूच्या बाटल्या, पाण्याच्या बाटल्या परिसरात फेकून देण्यात येतात. त्यामुळे फिरायला येणाऱ्या नागरिकांना त्रास होतो.

तळजाई टेकडी परिसरात गेल्या काही दिवसांपासून टोळक्यांकडून वाढदिवस साजरे करण्यात येत आहेत. कापण्यात आलेले केक , दारुच्या बाटल्या तेथेच टाकून देण्यात येत असल्याने फिरायला येणाऱ्या नागरिकांना त्याचा त्रास होत आहे.

रस्त्यावर वाढदिवस साजरे करण्याचे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. असे प्रकार केल्यास कारवाई करण्याच्या सूचना परिमंडळ एकच्या अखत्यारीतील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांना देण्यात आल्या आहेत. नागरिकांच्या तक्रारींची वाट न पाहता असे प्रकार दिसल्यास त्वरित कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.

– प्रियंका नारनवरे, पोलीस उपायुक्त, परिमंडळ एक