कर्नाटक आंब्यांच्या दरात मोठी घट

पुणे : चवीला कोकणातील हापूससारखा असणाऱ्या कर्नाटकातील आंब्यांचा हंगाम सुरू झाला असून कर्नाटकातून सध्या फळबाजारात आंब्यांची मोठी आवक होत आहे. आवक

चांगली असली, तरी करोनाच्या संसर्गामुळे कर्नाटकातील आंब्याच्या मागणीत घट झाली आहे. मागणीअभावी दरातही मोठी घट झाली आहे. किरकोळ बाजारात एक डझन कर्नाटक आंब्यांची विक्री ३०० ते ५०० रुपये दराने केली जात आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत कर्नाटक आंब्याचे दर कमी झाले आहेत. मार्च महिन्यात कर्नाटकातील आंब्यांची आवक सुरू होते. कर्नाटकातील तुमकुर परिसरातून आंब्यांची आवक होते. जून महिन्यांपर्यंत कर्नाटकातील आंब्याचा हंगाम सुरू असतो, अशी माहिती श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड अडते संघटनेचे सचिव, आंबा व्यापारी रोहन उरसळ यांनी दिली.

सध्या घाऊक बाजारात कर्नाटकातील आंब्यांची आवक वाढत असल्याने दरात घट झाली आहे. मे महिन्यात आंब्याची आवक आणखी वाढेल, असे त्यांनी नमूद केले. कर्नाटक आंब्याचे दर पुढीलप्रमाणे – कर्नाटक हापूस आंबा पेटी (तीन ते पाच डझन)-६०० ते १००० रुपये, पायरी- ५०० ते ८०० रुपये (चार डझन, पाच डझन), लालबाग- २० ते ४० रुपये किलो, तोतापुरी-२० ते ३५ रुपये, मलिका-४० ते ६० रुपये,

किरकोळ बाजारातील दर कर्नाटक हापूस एक डझन (फळाच्या आकारमानानुसार)- ३०० ते ५०० रुपये

हापूस आंब्यांना मागणी कमी

कोकण भागातून मार्केट यार्डातील फळबाजारात हापूसची चांगली आवक होत आहे. करोनाचा संसर्ग तसेच हापूसचे दर अद्याप सामान्यांच्या आवाक्यात न आल्याने ग्राहकांकडून मागणी कमी असल्याची माहिती मार्केट यार्डातील आंबा व्यापाऱ्यांनी दिली. करोनाचा संसर्ग पुन्हा वाढीस लागल्याने मागणीत घट झाली आहे.

करोनाच्या संसर्गामुळे निर्बंध आहेत. आंबा खरेदीदारांची संख्या कमी आहे. अशा परिस्थितीत कर्नाटकातून घाऊक फळबाजारात आंब्यांची आवक वाढत आहे. त्यामुळे कर्नाटक हापूस आंब्यांच्या दरात घट झाली आहे. मुंबई, बंगळुरु, अहमदाबाद, इंदूर, नागपूर, जयपूर येथील बाजारात देखील मागणीअभावी कर्नाटक हापूसचे दर कमी झाले आहे.

– रोहन उरसळ, आंबा व्यापारी, श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड