करोना प्रादुर्भावाचा सांस्कृतिक कार्यक्रमांवर मर्यादा आल्याने आर्थिक फटका

अस्तित्वासाठी धावा

पुणे : करोना प्रादुर्भावाचा सांस्कृतिक कार्यक्रमांना फटका बसला असल्यामुळे विघ्नहर्त्यां गणरायाच्या उत्सवामध्ये कलाकारांपुढे काम मिळवण्याचेच विघ्न उभे ठाकले आहे. वर्षभराची बेगमी सोडाच. पण, दैनंदिन जगण्यासाठी पुरेसा पैसा हाताशी नसल्याने सांस्कृतिक क्षेत्राला करोना साथरोगाची सर्वाधिक झळ बसली आहे.

गणरायाच्या उत्सवामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल आणि कलाकारांचा कलाविष्कार पाहण्यासाठी रसिकांची होणारी गर्दी असे चित्र दरवर्षीच्या गणेशोत्सवामध्ये दिसायचे. पण, करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी उत्सव साधेपाणाने साजरा करण्याचे ठरविले असल्याने एकपात्री कलाकार, लावणी-तमाशा, नाटय़कलाकार आणि गायक अशा सर्वच कलाकारांचा गणेशोत्सव कार्यक्रमांविना जात आहे. गेल्या वर्षी सांगली आणि कोल्हापुरातील पूर, विदर्भ आणि मराठवाडय़ातील दुष्काळाची स्थिती याबरोबरच बाजारपेठेतील आर्थिक मंदीचा फटका गणेशोत्सवातील सांस्कृतिक कार्यक्रमांना बसला होता. यंदा करोना महामारीचा फटका कलाकारांना बसला आहे. करोनाचा प्रादुर्भाव कमी झाला नाही तर आगामी नवरात्रोत्सवही कलाकारांसाठी कोरडा जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. साखर कारखाने, सूतगिरण्या आणि सहकारी दूध संघांतर्फे पूर्वी गणेशोत्सवात नाटके आणि लोकनाटय़ाच्या कार्यक्रमांना मागणी असायची. मात्र, सहकारी संस्था आर्थिक अडचणीत सापडल्याने सांस्कृतिक कार्यक्रमांना कात्री लावण्यात येते असा अनुभव असल्याचे ‘संवाद पुणे’ संस्थेचे सुनील महाजन यांनी सांगितले.गर्दी टाळण्याच्या उद्देशातून गेल्या पाच महिन्यांपासून नाटय़गृहे बंद आहेत. टाळेबंदीत कलाकारांचे हाल झाले असताना गणेशोत्सवात वातावरण निवळेल ही अपेक्षा फोल ठरली. प्रादुर्भाव वाढला तर नवरात्रोत्सवातील कार्यक्रमांवर परिणाम होण्याची शक्यता आहे, असे ‘मनोरंजन’ संस्थेचे मोहन कुलकर्णी म्हणाले.

ऑनलाइन कार्यक्रमांचा दिलासा

करोनाचा परिणाम गणेशोत्सवातील सांस्कृतिक कार्यक्रमांवर झाला असला, तरी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट, सेवा मित्र मंडळ व साईनाथ मंडळ ट्रस्ट या गणेश मंडळांनी ऑनलाइन सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करून संकटाचे संधीमध्ये रूपांतर केले आहे. सुरक्षित अंतर राखण्याच्या दृष्टिकोनातून गणरायाचे दर्शन ऑनलाइन घेत असताना सांस्कृतिक कार्यक्रमांनी नागरिकांना घरबसल्या कार्यक्रमांचा आनंद दिला.

ऑनलाइन माध्यमामध्ये आयोजक, कलाकार आणि प्रेक्षकही गोंधळलेले दिसतात. ऑनलाइन स्वरूपात म्हणजे कलाकाराने फुकट कार्यक्रम केला पाहिजे, अशी आयोजकांची अपेक्षा असते. मात्र, कला आणि कलाकार रसिकेतवर जगतात, याचे पुरेसे भान अजून आलेले नाही. साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्यामुळे गणेश मंडळांप्रमाणे सोसायटीतील कार्यक्रमांवर बंधने आली आहेत. कार्यक्रम होत नाहीत असे नाही. पण, कार्यक्रमांची संख्या घटली आहे. ऑनलाइन कार्यक्रमांमध्ये प्रेक्षकांची संख्या घटली असली, तरी जगभरात कोठूनही प्रेक्षक कार्यक्रमाचा आनंद लुटू शकतात.

 – मकरंद टिल्लू, एकपात्री कलाकार