तळेगावमधील प्रकार

पिंपरी : तळेगाव दाभाडे येथील एका खासगी रुग्णालयामध्ये अतिदक्षता विभागात करोनावर उपाचार घेणाऱ्या एका रुग्णाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. रुग्णालय प्रशासनाने हलगर्जीपणा केल्याचा आरोप करून रुग्णालयावर कडक कारवाईची मागणी मृताच्या नातेवाइकांनी केली आहे. दरम्यान, आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

सोमनाथ तुकाराम हुलावळे (वय ४४, रा. कार्ला, ता. मावळ) असे आत्महत्या केलेल्या करोनाबाधित रुग्णाचे नाव आहे. आत्महत्येप्रकरणी दिनेश हनुमंत हुलावळे यांनी तळेगांव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळेगांव दाभाडे येथे मायमर मेडिकल कॉलेज संचालित डॉ. भाऊसाहेब सरदेसाई ग्रामीण रुग्णालयात सोमनाथ हुलावळे हे अतिदक्षता विभागात उपचार घेते होते. रविवारी सकाळी त्यांनी अतिदक्षता विभागात असलेल्या दूरध्वनीच्या वायरने गळफास घेतला.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव तसेच इतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. आत्महत्येची माहिती कळल्यानंतर हुलावळे यांच्या नातेवाइकांनी तसेच काही स्थानिक राजकीय नेत्यांनी रुग्णालयात धाव घेऊन रुग्णालयीन प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडल्याचा आरोप केला. रुग्णालय प्रशासनावर कडक कारवाई करण्याची मागणी नातेवाइकांनी केली. नातेवाइकांनी केलेल्या आरोपामुळे रुग्णालयाच्या परिसरात तणाव निर्माण झाला होता.