करोनामुक्तांची संख्या पावणेदोन लाख, मृत्युसंख्या चार हजाराच्या घरात

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील करोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून सोमवारी या रुग्णसंख्येने दोन लाखांचा टप्पा ओलांडला. समाधानाची बाब म्हणजे, उपचारानंतर पावणेदोन लाख करोना रुग्ण बरे झाले आहेत. शहरातील एकूण मृत्युसंख्या चार हजाराच्या घरात असल्याने चिंतेचे वातावरण आहे.

करोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर पिंपरी-चिंचवडला १२ मार्च २०२० ला करोनाचा पहिला रुग्ण सापडला. काही दिवसांचा अपवाद वगळल्यास करोना रुग्णांची संख्या सतत वाढतच राहिली आहे. मार्च २०२१ मध्ये करोनाची वर्षपूर्ती झाली, तेव्हा शहरातील करोनाबाधितांची संख्या पुन्हा वाढू लागली होती. सध्या दररोज दोन ते अडीच हजार रुग्ण नव्याने निष्पन्न होत आहेत. या वेगामुळेच एप्रिल अखेरीस करोना रुग्णसंख्येने दोन लाखांचा टप्पा ओलांडला आहे. बरे होणारे रुग्ण जवळपास तितक्याच संख्येने आहेत, त्यामुळे समाधानाचे वातावरण आहे. शहरातील मृत्यूचे प्रमाण सुरुवातीला मर्यादित होते. अलीकडे, एकाच दिवशी ५० ते ६० मृत्यू होत आहेत. रविवारी ही संख्या ९४ तर सोमवारी ९३ इतक्या रुग्णांचा मृत्यू झाला. शहर आणि बाहेरील अशी मिळून एकूण मृत्युसंख्या चार हजाराजवळ पोहोचली आहे.

करोना रुग्णसंख्या वेगाने वाढते आहे. दररोज १० ते १२ हजार चाचण्या होत असून दोन हजाराहून अधिक करोनाबाधित आढळून येत आहेत. सध्याची परिस्थिती चिंताजनक असून नागरिकांनी अधिक खबरदारी घेतली पाहिजे. करोना नियमांचे पालन केले पाहिजे. अत्यावश्यक कामांशिवाय घराबाहेर पडता कामा नये. तरच ही संख्या नियंत्रणात येईल.

– डॉ. लक्ष्मण गोफणे, आरोग्य-वैद्यकीय अधिकरी, पिंपरी पालिका.

पिंपरीतील एकूण रुग्णसंख्या-दोन लाख १ हजार ९६०

’ उपचार होऊन बरे झालेले – १ लाख ७५ हजार १४८

’ मृत्युसंख्या ( एकूण)       – ३,९७९

’ पालिका हद्दीतील           – २७२३

’ हद्दीबाहेरील –                 १२५६     (२६ एप्रिलपर्यंत)