News Flash
Advertisement

वर्षभरात तीन हजार कैदी बाधित

आतापर्यंत राज्यातील वेगवेगळ्या कारागृहात असलेल्या सात करोनाबाधित कैद्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

राज्यातील लहान-मोठय़ा ६० कारागृहात ३५ हजार कैदी

पुणे : राज्यातील कारागृहांमध्ये सध्याही क्षमतेपेक्षा जास्त बंदी (कैदी)असून, ६० कारागृहांमध्ये एकूण ३५ हजार कैदी ठेवण्यात आले आहेत. आतापर्यंत राज्यातील ५७ हजार ३२ कैद्यांची करोना चाचणी करण्यात आली असून त्यापैकी तीन हजार ९७ कैदी करोनाबाधित असल्याचे चाचणीत निष्पन्न झाले आहे. त्यापैकी दोन हजार ८८७ कैदी करोनामुक्त झाले आहेत.

आतापर्यंत राज्यातील वेगवेगळ्या कारागृहात असलेल्या सात करोनाबाधित कैद्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. राज्यातील कारागृहात क्षमतेपेक्षा जास्त कैदी आहेत. राज्यातील ६० कारागृहात ३५ हजार कैदी आहेत,त्यापैकी बरेच कैदी न्यायाधीन बंदी आहेत. त्यांच्याविरोधात अद्याप गुन्हा सिद्ध झाला नसल्याने न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांना कारागृहात ठेवण्यात येते. कैद्यांना न्यायालयीन कामकाजासाठी न्यायालयात नेण्यात येते. गेल्या वर्षी देशभरात करोनाचा संसर्ग वाढीस लागल्यानंतर कारागृह प्रशासनाने उपाययोजना हाती घेतल्या. किरकोळ गुन्ह्य़ात कारागृहात असलेल्या न्यायाधीन बंद्यांना तात्पुरते जामीन देण्यात आले. कारागृहात गर्दी होऊ नये तसेच यंत्रणेवर ताण पडू नये म्हणून कारागृह प्रशासनाने तसा निर्णय घेतला होता, अशी माहिती कारागृह विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.

राज्यात येरवडा, ठाणे, कोल्हापूर, मुंबई, नाशिक, तळोजा, औरंगाबाद, अमरावती, नागपूर येथे मध्यवर्ती कारागृहे आहेत. कारागृहात कैदी दाखल करण्यापूर्वी त्यांची करोना चाचणी केली जाते.

एखादा कैदी बाधित असल्याचे आढळून आल्यानंतर त्याला तात्पुरत्या कारागृहात हलविण्यात येते. करोनाच्या  संसर्गामुळे तात्पुरती कारागृहे सुरू करण्यात आली आहे. तात्पुरत्या कारागृहात विलगीकरण कक्ष आहे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार विलगीकरणातील कैद्यांवर उपचार करण्यात येतात. एखादा रुग्ण गंभीर असल्यास त्याला त्वरित करोना उपचार केंद्रात दाखल करण्यात येते, असे कारागृहातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

तात्पुरत्या कारागृहांचा उपयोग

तात्पुरत्या कारागृहांचा मोठा उपयोग झाला. बाधित कैद्यांच्या आहारावर विशेष लक्ष देण्यात आले. वर्षभरात राज्यातील कारागृहात सात कैद्यांचा मृत्यू झाला आहे.  राज्यातील प्रमुख मध्यवर्ती कारागृहात पाच करोनाबाधित कै द्यांचा, तसेच धुळे येथील जिल्हा कारागृहात एका कैद्याचा, तर सोलापूर जिल्हा कारागृहात एका कैद्याचा मृत्यू झाला आहे.

पाश्चात्त्य देशांच्या तुलनेत आपल्याकडील कारागृहात करोना संसर्गाचे प्रमाण कमी राहिले. गेल्या वर्षभरात राज्यातील कारागृहातून साठ ते सत्तर हजार कैदी बाहेर पडले. कारागृह प्रशासनाने कैद्यांबरोबर समन्वय साधला. बाहेरून कारागृहात येणाऱ्या कैद्यांना थेट प्रवेश न देता त्यांची तात्पुरत्या कारागृहात रवानगी करण्यात आली. बाहेरून येणाऱ्या प्रत्येक कैद्याची तपासणी करण्यात आली. एखादा कैदी बाधित आढळल्यास त्याच्यावर त्वरित उपचार करण्यात आले. – सुनील रामानंद, अतिरिक्त पोलीस महासंचालक, राज्य कारागृह विभाग

24
READ IN APP
X
X