करोनाग्रस्तांची नावं उघड करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असे आदेश विभागीय उपायुक्त डॉ. दीपक म्हैसकर यांनी दिले आहेत. ज्यांना करोनाची लागण झाल्याचा संशय आहे त्यांनी शक्यतो घरातच थांबावं असंही म्हैसकर यांनी म्हटलं आहे. पुणेकरांनी खबरदारी घ्यावी असंही आवाहन त्यांनी केलं आहे. गर्दीची ठिकाणं टाळा, वेळोवेळी हात धुवा. घरात असलेल्या ज्येष्ठ नागरिकांची काळजी घ्या. जिथे अनोळखी लोकांचा संपर्क होईल त्या ठिकाणी उदाहरणार्थ मॉल, बाजारपेठा या ठिकाणी जाणं टाळा. हा नियम माझ्यासकट सगळ्यांना लागू आहे असंही म्हैसकर यांनी म्हटलं आहे.

काही करोना संशयितांची नावं उघड झाली, ज्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांना नाहक त्रास सहन करावा लागला. त्यामुळे त्यांना मनस्ताप झाला.  आज दुबईहून संध्याकाळी काही प्रवासी येणार आहेत. त्या सर्वांची विमानतळावर तपासणी केली जाणार आहे. जर त्यापैकी कुणी करोनाग्रस्त असेल त्या प्रवाशाला वेगळ्या कक्षात ठेवलं जाणार आहे. पुणे आणि पिंपरी या दोन शहरात मिळून जे 8 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे ज्या भागातील रुग्ण आहेत. तो किमान 3 किलोमीटरचा भाग बफर झोन करण्यात आले असून असे 4 ठिकाणं आहेत. असंही म्हैसकर यांनी स्पष्ट केलं.