करोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी केंद्राबरोबरच राज्य सरकारनंही पाऊलं उचलली आहेत. राज्यातील शाळा, महाविद्यालय ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे तसेच सार्वजनिक कार्यक्रम न घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, याच आदेशाला पुण्यातील ससाणे एज्युकेशन सोसायटीच्या संस्थाचालकांकडून केराची टोपली दाखविण्यात आली आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला हजेरी लावत राज्याचे अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आदेशाचं पालन न करता शाळेचं उद्घाटन केलं.

करोना व्हायरस या आजाराने जगभरात थैमान घातले आहे. या आजाराचे रुग्ण भारतात देखील आढळले असून, याच दरम्यान दोन रुग्णांचा मृत्यू देखील झाल्याची घटना घडली आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक राज्याकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. तर आपल्या महाराष्ट्रात ३१ मार्च शाळा, महाविद्यालय, जलतरण तलाव, मॉल्स, व्यायामशाळा, नाट्यगृहे, सिनेमागृह बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मात्र याच शासन निर्णयाला केराची टोपली दाखविण्याचे काम पुण्यातील हडपसर येथील ससाणे एज्युकेशन सोसायटी न्यू इंग्लिश स्कूलकडून करण्यात आले आहे.

या स्कूलचे उदघाटन राज्याचे अन्न आणि पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिक्षक, विद्यार्थी आणि पालक वर्ग मोठ्या संख्येने हजर होता. करोनाचा प्रसार रोखण्यासाठी एका बाजूला राज्य सरकारनं शाळांना सुट्टी दिली आहे, तर दुसरीकडं अशा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. याप्रकरणी आदेशाचं पालन न करणार्‍या संस्थाचालक, शिक्षक यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असे आदेश देण्यात आले आहेत. मात्र राज्याच्या मंत्र्याच्या उपस्थितीमध्ये भव्य असा कार्यक्रम घेतला गेला आहे. यामुळे विद्यार्थ्याच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार झाला आहे. आता संबधित मंत्री आणि संस्था चालक यांच्यावर काय कारवाई केली जाते, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

दोन वेळा कार्यक्रम रद्द करावा लागला म्हणून… : भुजबळ

यासंदर्भात छगन भुजबळ यांनी खुलासाही केला आहे. “ससाणे एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल इमारतीचे आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांच्या पुतळ्याचे उद्घाटन करण्याचे नियोजन दोन वेळा ठरले होते. मात्र काही कारणास्तव प्रत्येक वेळी हा कार्यक्रम रद्द करावा लागला. आजचा कार्यक्रम देखील फार पूर्वीच नियोजन केले होते. त्यामुळे आज कार्यक्रमाला आलो आहे. त्यामुळे या ठिकाणी कोणत्याही प्रकाराचे भाषण करणार नसून, प्रत्येकाने काळजी घ्यावी,” असंही भुजबळ म्हणाले.