१४ एप्रिलला विक्रमी १३ विशेष गाड्या रवाना; आणखी अतिरिक्त गाड्या सोडण्याचे नियोजन

पुणे : राज्यात कठोर निर्बंध लागू केल्यानंतर परराज्यातील मजूर आणि कामगार मोठ्या संख्येने मूळ गावी परतत असताना त्याचा भार रेल्वेवर पडला आहे. पुणे आणि मुंबईतून विशेषत: उत्तरेकडे जाणाऱ्या गाड्या तुडुंब होत असून, प्रवाशांची संख्या लक्षात घेता अतिरिक्त विशेष गाड्या सोडण्यात येत आहेत. १४ एप्रिलला पुणे आणि मुंबईतून एकाच दिवशी उत्तरेकडील राज्यांत विक्रमी १३ विशेष गाड्या रवाना करण्यात आल्या आहेत. जाणाऱ्या गाड्यांना मागणी असताना येणाऱ्या गाड्या मात्र काही प्रमाणात रिकाम्या धावत असल्याचे चित्र आहे.

करोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता पुण्यात १ एप्रिलपासूनच निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून पुण्यातून परराज्यात जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. आता राज्यभर कठोर निर्बंध लागू करण्यात आल्यामुळे सर्वच ठिकाणाहून मजूर आणि कामगारांचे लोंढे मुंबई, पुण्यासह इतर स्थानकातून सुटणाऱ्या गाड्यांमधून मूळ गावी परतत आहेत. सद्य:स्थितीत उत्तरेकडील दानापूर, भागलपूर, गोरखपूर, लखनौ आदी भागांत जाणाऱ्या गाड्यांना प्रचंड मागणी आहे. त्यामुळे गाड्यांची प्रतीक्षा यादी लक्षात घेऊन रेल्वेकडून अतिरिक्त गाड्या सोडल्या जात आहेत.

रेल्वेकडून सध्या सर्वच गाड्या ‘विशेष’ म्हणून धावत आहेत. त्यात सणांसाठी आणि उन्हाळी सुट्यांसाठी सोडण्यात येणाऱ्या विशेष गाड्यांचाही समावेश आहे. मध्य रेल्वेने आतापर्यंत २३० उन्हाळी विशेष गाड्या जाहीर केल्या आहेत.

उत्तरेकडील गाड्यांना प्रचंड मागणी असताना राज्यांतर्गर्त ंकवा इतर काही ठिकाणी जाणाऱ्या लांब पल्ल्यांच्या गाड्यांना मागणी नसल्याने त्यातील काही गाड्या रद्दही करण्यात येत आहेत. मध्य रेल्वेने १४ एप्रिलला एकाच दिवशी मुंबई आणि पुण्यातून उत्तरेकडे १३ गाड्या सोडण्यात आल्या. प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन आठवडाभरात पुण्यातून १२ गाड्या सोडण्यात आल्या. पुढील काही दिवसांत २० अतिरिक्त गाड्यांचे नियोजनही करण्यात आले आहे.

केवळ ‘कन्फर्म’ तिकिटावरच प्रवेश

रेल्वेकडून सध्या सोडण्यात येत असलेल्या विशेष आणि अतिरिक्त विशेष गाड्यांमध्ये सर्वसामान्य डबे नाहीत. त्यामुळे केवळ आरक्षण करून आणि तिकीट कन्फर्म असल्यासच संबंधित प्रवाशाला गाडीत प्रवेश दिला जात आहे. त्यामुळे प्रवाशांनी स्थानकावर गर्दी करू नये. प्रवास करण्यापूर्वी ९० मिनिटे आधी स्थानकात प्रवेश करावा. रेल्वेचे प्रतीक्षा यादीकडे लक्ष असून, आवश्यकतेनुसार अतिरिक्त विशेष गाड्या सोडण्यात येतील, असे मध्य रेल्वेने स्पष्ट केले आहे.

उत्तरेकडे जाणाऱ्या गाड्यांना सध्या मोठी मागणी आहे. गाड्यांची प्रतीक्षा यादी पाहून रेल्वेकडून अतिरिक्त विशेष गाड्यांचे नियोजन करण्यात येत आहे. दानापूर, भागलपूर, गोरखपूर, लखनौ आदी भागात सध्या गाड्या सोडण्यात येत आहेत. आवश्यकता भासल्यास आणखी विशेष गाड्या सोडल्या जातील. – मनोज झंवर, पुणे रेल्वे जनसंपर्क अधिकारी