पुण्यातील एका करोनाबाधित महिलेचा पिंपरी-चिंचवड शहरात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तिच्यावर गेल्या काही दिवसांपासून महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात उपचार सुरू होते. यामुळे पिंपरी-चिंचवडमधील करोनाबाधित मृतांची एकूण संख्या सहावर पोहचली आहे. दरम्यान, आज शहरात नवे आठ करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यात बहुतांश तरुणांचा समावेश आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात एकूण १४२ करोनाबाधितांची संख्या झाली असून सहा जणांचा मृत्यू झाला आहे. यातील काही जण पिंपरी-चिंचवड हद्दी बाहेरील आहेत. दरम्यान, ६२ जणांना महानगरपालिकेच्या रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून ते सर्व ठणठणीत बरे झाले आहेत. आज आढळलेले करोनाबाधित रुग्ण हे मोशी, पिंपळे गुरव आणि चिंचवड परिसरातील आहेत. गेल्या काही दिवसांपासून पिंपळे गुरव, मोशी या परिसरात रुग्ण आढळत असल्याने येथील काही परिसर सील करण्यात आले आहेत.

शहरात नव्याने करोनाबाधित आढळलेल्या व्यक्ती या २१ ते २८ वयोगटातील आहेत. तर एकाचे वय ५० वर्षे आहे. तसेच करोनाबाधित महिलांमध्ये २५ ते २८ वयोगटातील तरुणींचा समावेश असल्याने तरुणांनी याबाबत जास्त खबरदारी बाळगणं महत्वाचं आहे. करोनाला हरवायचं असेल तर घरी राहणं गरजेचं असून महत्वाचं काही काम असेल तरंच बाहेर पडावं असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.