07 July 2020

News Flash

करोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा बालरंगभूमी चळवळीला फटका

विद्यार्थ्यांची उन्हाळ्याची सुटी हा साधारणपणे बालरंगभूमीचा कालखंड असतो. 

२५ ते ३० लाख रुपयांची उलाढाल ठप्प

पुणे : करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीचा फटका बालरंगभूमी चळवळीला बसला आहे. करोनाचा प्रादुर्भाव संपल्यावर नाटय़गृहांमध्ये नव्या उत्साहामध्ये प्रयोग सादर होतील. पण, उन्हाळ्याची सुटी हातून निसटल्यामुळे बालनाटय़ांसाठी मात्र पुढच्या वर्षीची प्रतीक्षा करावी लागणार आहे. एप्रिल-मे या कालावधीत पुणे आणि मुंबईतील संस्थांच्या बालनाटय़ांचे  मिळून सव्वाशे प्रयोग होतात. साधारणपणे २५ ते ३० लाख रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे.

विद्यार्थ्यांची उन्हाळ्याची सुटी हा साधारणपणे बालरंगभूमीचा कालखंड असतो.  एप्रिलच्या मध्यापासून ते मे महिन्याच्या अखेपर्यंत बालनाटय़ांचे प्रयोग होतात. दिवाळीच्या सुटीचा कालखंड कमी असल्यामुळे बालरंगभूमी क्षेत्रातील कलाकारांची भिस्त उन्हाळ्याच्या सुटीवर असते. प्रकाश पारखी, राजा राणा, मंदार बापट, सागर लोधी यांसह वेगवेगळे निर्माते-दिग्दर्शक बालनाटय़ांचे प्रयोग सादर करतात. स्थानिक शालेय मुलांबरोबरच बाहेरगावांवरून पुण्यात आपल्या नातलगांकडे येणारी मुले नाटय़प्रयोगांना गर्दी करतात. उन्हाळ्याच्या सुटीत अभिनय कार्यशाळा, नाटय़शिबिर अशा विविध उपक्रमांना मुलांचा मोठा प्रतिसाद मिळतो. या कार्यशाळा आणि शिबिरांच्या संयोजकांना करोनाचा फटका बसला आहे. बालकलाकारांसाठी व्यासपीठ ही बालनाटय़ांची ओळख आहे. सातवीपर्यंतची मुले हे या नाटकांचे हक्काचे प्रेक्षक असतात. दूरचित्रवाणी मालिका, मोबाइल यात गुरफटलेल्या मुलांना मनोरंजनाबरोबरच संस्कार देणारी बालनाटय़े पाहावयास मिळण्याची शक्यता मावळली आहे. पुणे आणि मुंबईमध्ये करोनाचा प्रभाव आहे. मात्र, राज्यात अन्यत्र बालनाटय़ांचे प्रयोग होत नाहीत, अशी माहिती संवाद पुणे संस्थेचे सुनील महाजन यांनी दिली. मुलांमध्ये नाटकाबद्दल गोडी निर्माण करण्यासाठी धडपडणाऱ्या बालरंगभूमी चळवळीला यंदा करोनामुळे खीळ बसली. त्याचवेळी बालनाटय़े रंगभूमीवर आणणाऱ्या संस्थांसह कलाकार, तंत्रज्ञ यांचेही मोठे आर्थिक नुकसान झाले आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

आधुनिक माध्यमाची कास

बालनाटय़े आणि नाटय़ शिबिर होत नसले, तरी मुलांच्या मनोरंजनासाठी फेसबुक लाइव्ह या आधुनिक माध्यमाची कास धरली आहे, अशी माहिती नाटय़संस्कार कला अकादमीचे संस्थापक प्रकाश पारखी यांनी दिली.  ‘जादूचे घर’ या गोष्टीचे अभिवाचन आणि ‘नकला नगरी’ हा एकपात्री कार्यक्रम सादर केला गेला.नाटय़छटा लेखन स्पर्धेमध्ये राज्यभरातून १२० जणांनी सहभाग घेतला. त्यातील एक स्पर्धक अमेरिकेतून सहभागी झाला होता. ‘आजोबांच्या घरी रोबोट आणि परी’  बालनाटय़ाचे प्रयोग होणार होते. ते आता दिवाळीच्या सुटीतच होतील, असे पारखी यांनी सांगितले.

चार नाटय़गृहांमध्ये सकाळची वेळ

उन्हाळ्याच्या सुटीत बालगंधर्व रंगमंदिर, यशवंतराव चव्हाण नाटय़गृह, भरत नाटय़ मंदिर आणि िपपरी-चिंचवड नाटय़गृह या चार नाटय़गृहांमध्ये सकाळी दहा ही वेळ बालनाटय़ांसाठी राखून ठेवलेली असते. काही संस्था एका तिकिटाच्या दरामध्ये दोन बालनाटय़े सादर करतात. एका नाटकाला सुमारे १५ ते २० हजार रुपयांची तिकिट विक्री होते. गेल्या वर्षी वैभव मांगले यांची भूमिका असलेल्या ‘अलबत्या गलबत्या’ या नाटकाने बालप्रेक्षकांना बालरंगभूमीकडे खेचून आणले होते. या नाटकाला लाभलेल्या प्रतिसादामुळे उलाढालीमध्ये वाढ झाली होती, अशी माहिती सुनील महाजन यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 2, 2020 2:21 am

Web Title: corona virus infection balrangbhumi blow to the movement akp 94
Next Stories
1 गुंडाच्या  मिरवणुकीत पोलीस सहभागी
2 उद्योजकांना खंडणीसाठी धमक्या
3 ‘डेक्कन क्वीन’ला ९० वर्षे पूर्ण!
Just Now!
X