News Flash

करोनामुळे मागणीत वाढ झाल्याने चिकन महागले

सध्या बाजारात जिवंत कोंबड्यांचा तुटवडा जाणवत आहे.

(संग्रहित छायाचित्र)

चिकन २५० रुपये किलो; बाजारात कोंबड्यांचा तुटवडा

पुणे : बर्ड फ्लूच्या संसर्गामुळे चिकनच्या मागणीत काही महिन्यांपूर्वी घट झाली होती. त्यामुळे कुक्कुटपालन व्यावसायिकांकडून कोंबड्यांचे पालन कमी प्रमाणावर केले गेले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून चिकनच्या मागणीत वाढ झाल्याने जिवंत कोंबड्यांचा तुटवडा मोठ्या प्रमाणावर जाणवत असल्याने चिकनच्या दरात वाढ झाली आहे. एरवी १५० ते १६० रुपये किलो असणाऱ्या चिकनचे दर अडीचशे रुपयांपर्यंत जाऊन पोहोचले आहेत.

करोनाचा संसर्ग वाढीस लागल्याने चिकन तसेच अंडी सेवन करण्याचे प्रमाण वाढले आहे. बर्ड फ्लूच्या संकटात अनेक कुक्कुटपालन व्यावसायिकांनी पक्ष्यांचे पालन केले नाही. टाळेबंदीची भीती तसेच कोंबड्यांच्या तुटवड्यामुळे गेल्या पंधरवड्यापासून चिकनच्या दरात वाढ झाली आहे. गेल्या वर्षी करोनाचा संसर्ग वाढीस लागल्याने एप्रिल-मे महिन्यात चिकनच्या दरात मोठी वाढ झाली होती, असे पुणे जिल्हा बॉयलर ट्रेडर्स असोसिएशनचे संचालक अणि शीतल अ‍ॅग्रो ट्रेडिंगचे रूपेश परदेशी यांनी सांगितले.

उन्हाळ्यात कुक्कुटपालन व्यवसायावर परिणाम होतो. पाण्याचा तुटवडा जाणवत असल्याने ग्रामीण भागातील  कुक्कुटपालन केंद्रे बंद ठेवण्यात येतात. त्यामुळे सध्या बाजारात जिवंत कोंबड्यांचा तुटवडा जाणवत आहे. उन्हाळ्यात जिवंत कोंबड्यांचे (पक्ष्यांचे) वजन वाढत नाही. या कालावधीत पक्षी मोठ्या प्रमाणावर पाणी पितात. त्यामुळे उत्पादन खर्च वाढला आहे. कोंबड्यांचे खाद्य महाग झाले आहे. पक्ष्यांचे संगोपन करण्याचा खर्च वाढल्याने चिकनच्या दरात वाढ होत आहे, असे त्यांनी सांगितले.

पुणे, पिंपरीत दररोज २०० ते २५० टन विक्री

करोनाच्या संसर्गामुळे सध्या शहरातील हॉटेल बंद आहेत. त्यामुळे चिकनच्या मागणीत घट झाली असली तरी पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहर परिसरात दररोज दोनशे ते अडीचशे टन चिकनची विक्री होते. हॉटेल व्यवसाय सुरू असता तर चिकनची मागणी २८० ते ३०० टनांपर्यत गेली असती. पुणे जिल्ह्यातील इंदापूर, नगर परिसरातील सुपा, शिरूर, सातारा रस्त्यावरील गावांमधील कुक्कुटपालन व्यावसायिक शहर परिसरात कोंबड्या विक्रीस पाठवितात, असे चिकन विक्रेते रूपेश परदेशी यांनी सांगितले.

प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी शरीराला विपुल प्रमाणात प्रथिनांची आवश्यकता असते. प्रथिनांमुळे शरीरातील लाल पेशी वाढायला मदत होते तसेच आजारातून  लवकर बरे होता येते. डाळी, कडधान्ये, दूध, दुग्धजन्य पदार्थ, सोयाबिन आदी पदार्थांतून प्रथिने मिळतात. चिकन, अंड्यांमध्ये भरपूर प्रथिने आहेत. त्यामुळे सामिष खवय्यांकडून चिकन, अंड्यांचे सेवन केले जाते. – अर्चना रायरीकर, आहारतज्ज्ञ

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 8, 2021 12:04 am

Web Title: corona virus infection chicken rate in pune bird flu akp 94
Next Stories
1 अजूनही ‘फुलराणी’मध्ये बसण्याची ओढ
2 नियमांचे पालन करून दुकाने उघडण्यास परवानगीची मागणी
3 पुण्यातला धक्कादायक प्रकार; धावत्या रिक्षात सहप्रवाशी महिलेकडे बघून हस्तमैथुन; आरोपीला अटक
Just Now!
X